पुणे: PMC News शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलाव येथे वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला तातडीने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावत असल्याने मासे मृत्यूमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर, संबंधित यंत्रणांना सजग राहण्याचा इशारा देण्यात आला.
पाहणीदरम्यान तलावातील पाण्याचा दूषितपणा, तसेच सीओडी (Chemical Oxygen Demand) आणि बीओडी (Biochemical Oxygen Demand) यांच्या वाढलेल्या पातळीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तलावात विविध नाल्यांद्वारे सांडपाणी मिसळत असल्यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या मैला शुध्दीकरण प्रकल्पांची (एसटीपी) कार्यक्षमता तपासून, प्रक्रिया केलेले पाणी निकषांनुसारच तलावात सोडले जाईल यासाठी काटेकोर देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
महापौरांनी पुणे महानगरपालिका हद्दीतील नाले, पाणीप्रवाह आणि संबंधित यंत्रणांचीही पाहणी केली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, अडथळे तसेच अनधिकृत सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच दूषित पाणी थेट तलावात जाणार नाही, यासाठी 'ड्रेनेज डायव्हर्जन' उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले.
तलावाचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणे, नाल्यांमधील सांडपाणी रोखणे, तलाव परिसरात स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविणे, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून पारदर्शक अहवाल प्रणाली सुरू करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढवून जनजागृती करणे, अशा उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.
या पाहणीवेळी नगरसेविका रोहिणी चिमटे व मयुरी कोकाटे उपस्थित होत्या. तसेच प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (पर्यावरण) किशोरी शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सहभाग घेतला.
महापौरांनी स्पष्ट केले की, पाषाण तलावाचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्ती ही शहराच्या पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून अल्पावधीत ठोस आणि दृश्यमान परिणाम साध्य करावेत, असेही त्यांनी बजावले.

