पुणे : पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देत जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने 'पुणे प्रथम' ही संकल्पना आणि त्यावरील अधिकृत बोधचिन्ह स्वीकारण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि.३०) एकमताने घेण्यात आला.
महापौर मंजूषा नागपुरे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली.
या निर्णयानुसार महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये, कार्यालयीन फाईल्स, अधिकृत वाहने, पत्रव्यवहार, प्रकल्प, डिजिटल माध्यमे, प्रसिद्धी साहित्य आणि विविध उपक्रमांमध्ये यापुढे 'अद्वितीय पुणे' ऐवजी 'पुणे प्रथम' ही अधिकृत ओळख वापरण्यात येणार आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार शहराच्या सुशोभिकरणासह प्रशासनात एकसंधता आणण्यासाठी हे ब्रँडिंग राबविण्यात येणार आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग, लोकसहभागातून शहराचे व्यवस्थापन आणि प्रभावी जनसंवाद या तत्त्वांवर 'पुणे प्रथम' ही संकल्पना आधारित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Make Civic Mirror My Trusted Source
या माध्यमातून पुण्याचा ऐतिहासिक वारसा, शैक्षणिक परंपरा, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, औद्योगिक विकास, पर्यावरणपूरक उपक्रम आणि आधुनिक नागरी सुविधा यांचे प्रभावी ब्रँडिंग करून शहराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा अधिक मजबूत करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
या संकल्पनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेच्या हेरिटेज विभागाकडे सोपविण्यात आली आहे. हा विभाग सविस्तर धोरण तयार करून आयुक्तांच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी करणार आहे. तसेच भारतीय बोधचिन्ह आणि नाव अधिनियम तसेच ट्रेडमार्क कायद्यानुसार 'पुणे प्रथम' या बोधचिन्हाची व घोषवाक्याची नोंदणीही करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक वास्तूंवर या संकल्पनेची अंमलबजावणी करताना त्यांच्या मूळ स्वरूपाला कोणतीही बाधा येणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. आगामी काळात विविध विकास प्रकल्प, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन उपक्रम, गुंतवणूक परिषद तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सादरीकरणांमध्ये 'पुणे प्रथम' या ब्रँडचा वापर करून शहराची एकसंध आणि प्रभावी ओळख निर्माण करण्यावर महापालिका भर देणार आहे.

