पुणे महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून २०२६-२७ ची मिळकतकराची देयके तयार, वाटप सुरू
पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य कणा असलेल्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ ची मिळकतकराची देयके तयार करण्यात आली असून, शहरात त्यांचे प्रत्यक्ष वाटप सुरू झाले आहे.
प्रशासनाने यंदाही नागरिकांसाठी आकर्षक सवलत योजना जाहीर केली असून, ३१ मे पूर्वी कराचा पूर्ण भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना ५ ते १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.
मिळकतकर विभागाने तयार केलेली चालू वर्षाची बिले टपाल कार्यालयामार्फत नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेने नागरिकांना कर भरण्यासाठी खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ३१ मेपर्यंत पूर्ण कर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्के सवलत देण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक आणि कॉसमॉस बँक यांच्या अधिकृत शाखांमध्ये कर स्वीकारला जाईल. तसेच महापालिकेची सर्व विभागीय कार्यालये व नागरी सुविधा केंद्रे सोमवार ते शनिवार, सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत सुरू राहतील.
शहराच्या विस्तारामुळे महसुलात मोठी वाढ
पुणे शहराचा वाढता विस्तार आणि सभोवताली उभे राहणारे नवनवीन गृहप्रकल्प यामुळे महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची भर पडत आहे. बांधकाम विभाग आणि मिळकतकर विभाग हे पालिकेचे उत्पन्नाचे सर्वात मोठे स्रोत मानले जातात. विशेषतः नवीन मिळकतींची नोंदणी वाढल्याने महापालिकेचा महसूल यंदा ऐतिहासिक टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
समाविष्ट गावांतील करवसुलीचा पेच कायम
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमुळे पालिकेचे उत्पन्न वाढण्याची मोठी अपेक्षा होती. मात्र, या भागातील कर आकारणी अधिक असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर राज्य सरकारने येथील करवसुलीला स्थगिती दिली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे पालिकेच्या उत्पन्नावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. असे असले तरी, अनेक जागरूक नागरिक स्वतःहून पुढाकार घेत कर भरत आहेत. मागील आर्थिक वर्षात या गावांमधून ५०० कोटी रुपयांहून अधिक कर जमा झाला असून, ही स्थगिती उठवण्यासाठी प्रशासनाचे राज्य सरकारकडे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
ऑनलाईन पेमेंट करण्याचे आवाहन
केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने कर भरावा. सुलभ आणि सुरक्षित पेमेंटसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म अधिक सोयीस्कर आहे. पुणेकरांनी वेळेत कराचा भरणा करून महापालिकेच्या सवलत योजनेचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासकामांत सहकार्य करावे, असे आवाहन मिळकतकर विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी नागरिकांना पुणेकरांना केले आहे.

