Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PMC Pune : पु. ल. देशपांडे उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी कारवाई, बेकायदेशीर वृक्षतोडीवर पुणे महापालिका कठोर

PMC Pune : पु. ल. देशपांडे उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी कारवाई, बेकायदेशीर वृक्षतोडीवर पुणे महापालिका कठोर

सर्व उद्यानांमधील सुरक्षेत होणार वाढ

पुण्यातील प्रसिद्ध पु. ल. देशपांडे उद्यानातील बेकायदेशीर वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीच्या गंभीर प्रकारावर 'सीविक मिरर'ने वृत्त प्रसिध्द केले होते.

या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे महापालिकेने गंभीर दखल घेत, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी (दि.३०) पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि पुण्यातील सर्व पालिका उद्यानांच्या सुरक्षेचा तातडीने सर्वंकष आढावा घेण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता झाडांची तोडणी सुरू होती. तोडलेल्या झाडाची लाकडे वाहनातून परस्पर बाहेर नेली जात असताना स्थानिक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांना संशय आला. त्यांनी लाकडांनी भरलेला टेम्पो अडवून चालकाकडे परवानग्याची विचारणा केली असता, कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात महापालिकेच्या वृक्ष निरीक्षकासह संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पालिकेची अंतर्गत चौकशीही सुरू आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत बोलताना श्रीनाथ भिमाले म्हणाले, "उद्यानामध्ये अशा प्रकारे नियमबाह्य वृक्षतोड किंवा लाकूड चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पालिकेने सक्षम व प्रभावी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. शहरातील प्रत्येक उद्यानात पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करून तेथील देखरेख कडक केली जावी. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर प्रशासनाने कायद्यानुसार कडक कारवाई करावी."

Pune : पुणे रेल्वे स्टेशनवर रविवारी ९ तासांचा मेगाब्लॉक.! अनेक गाड्या रद्द; काहींचे मार्ग बदलणार…

यावर प्रशासनाने बैठकीत स्पष्टीकरण दिले की, उद्यानात केवळ पडलेली झाडे एकत्र करून नियमानुसार त्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कंत्राटदाराने परस्पर झाडे तोडून ती वाहनात भरून नेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर कंत्राटदार आणि एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून उद्यानातील सुरक्षा रक्षक बदलण्याचे आदेश दिले आहेत.

अशा प्रकारे महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे आणि परवानगीशिवाय वृक्षतोड करणे हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि भविष्यात असा प्रकार घडणार नाही यासाठी सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक ते सर्व बदल केले जातील.
-श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका

दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, पालिकेची चौकशी समितीही स्वतंत्रपणे काम करत आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल, तसेच शहरात टप्प्याटप्प्याने नवी सुरक्षा योजना राबवली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

उद्यानांच्या सुरक्षेसाठी तातडीची पावले

या घटनेनंतर महापालिका प्रशासन शहरातील सर्व उद्यानांसाठी नवीन सुरक्षा नियमावली लागू करणार आहे. उद्यानांमधील सुरक्षा रक्षकांची उपस्थिती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता आणि प्रवेशद्वारावरील तपासणी अधिक कडक केली जाईल. झाडांची छाटणी किंवा विल्हेवाट लावताना अधिकृत परवानगी आणि पालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असेल. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror