Dailyhunt
Pune | अपघातांचा 'डेथ ट्रप'..! नवले पुलावर पुन्हा थरार; भरधाव कंटेनरच्या धडकेत पिकअप वाहनाचा चेंदामेंदा, एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.

Pune | अपघातांचा 'डेथ ट्रप'..! नवले पुलावर पुन्हा थरार; भरधाव कंटेनरच्या धडकेत पिकअप वाहनाचा चेंदामेंदा, एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल हा डेथ स्पॉट बनला आहे. सोमवारी (दि.४) नवले पुलावर तीन मालवाहतूक वाहनांची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. दोन ट्रकच्यामध्ये सापडलेल्या पिकअपचा अक्षरश: चेंदामेदा झाला.

या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गर्दीच्या वेळी झालेल्या अपघातामुळे परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हॉटेल पिगारा समोर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने समोरच्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की पिकअप वाहनाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात चालक महादेव उत्तम शेंडे (वय २२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमित कांबळे गंभीर जखमी झाले. पुढे आणखी एका टाटा आयशर वाहनालाही धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अडकलेल्या वाहनांना बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातग्रस्त वाहनांत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

अपघातामुळे नवले पूल आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कामावर जाणाऱ्या नोकरदारांना आणि प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, नवले पुलावर वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे अपघाताच्या घटनांची मालिका थांबणार तरी कधी? आणखी किती निष्पाप जीव गमावल्यानंतर प्रशासन जागे होणा? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

नवले पूल परिसर गेल्या काही वर्षांत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात धोकादायक आणि संवेदनशील अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात आहे. कात्रज बोगदा पार केल्यानंतर लगेच सुरू होणारा तीव्र उतार, वेगात येणारी अवजड वाहने आणि नियंत्रणासाठी अपुरी व्यवस्था यामुळे हा भाग अपघातांचा सततचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा केवळ एक रस्ता राहिलेला नसून, तो आता प्रवाशांसाठी एक गंभीर धोका बनला आहे.

नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनेक ठोस उपाय सुचवले आहेत. ज्यामध्ये जड वाहनांची नियमित आणि अनिवार्य ब्रेक तपासणी करणे, वेगमर्यादेचे कठोर पालन करणे, या भागात सतत पोलीस बंदोबस्त ठेवणे, स्वतंत्र सेवा रस्ता विकसित करणे आणि उतारावर वेग नियंत्रक यंत्रणा बसवणे या उपायांचा समावेश आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणेही अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण रस्त्याच्या अभियांत्रिकी रचनेचे पुनर्मूल्यांकन करून दीर्घकालीन सुधारणा करणे ही काळाची गरज आहे.

दरम्यान, काल झालेला अपघात पुन्हा एकदा एक कठोर इशारा देऊन गेला आहे. नवले पूलवरील मृत्यूंची ही मालिका थांबवायची असेल, तर आता विलंब न करता निर्णायक पावले उचलावी लागतील. अन्यथा हा परिसर आणखी अनेक निष्पाप जीवांचा बळी घेत राहील. म्हणूनच हा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येतो आणखी किती मृत्यू झाल्यानंतर नवले पूल खऱ्या अर्थाने सुरक्षित होणार?

आठ वर्षात ८० जणांनी गमावले जीव

गेल्या आठ वर्षांत या परिसरात सुमारे २१० अपघात घडले असून, ८० हून अधिक जणांचे जीव गमावले आहेत. प्रत्येक अपघातानंतर काही काळासाठी चिंता व्यक्त केली जाते, मात्र समस्या मूळापर्यंत जाऊन सोडवली जात नाही. या अपघातांचे स्वरूप पाहिले असता काही ठळक आणि पुनरावृत्ती होणारी कारणे समोर येतात. कात्रज बोगद्यानंतरचा अचानक तीव्र उतार हा वाहनचालकांसाठी मोठे आव्हान ठरतो. अनेक जड वाहने या उतारावर वेग कमी न करता खाली येतात. काही चालक इंधन वाचवण्यासाठी वाहन न्यूट्रलमध्ये टाकतात, ज्यामुळे नियंत्रण पूर्णपणे सुटते. त्यातच ब्रेक प्रणालीवर येणारा अतिरिक्त ताण अनेकदा अपघाताचे कारण ठरतो. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे क्षणात घडणारे भीषण अपघात.

नवले पुलावर अपघाताची मालिका कायम

गेल्या काही वर्षांतील घटनांनी या धोक्याचे गांभीर्य अधिक स्पष्ट केले आहे. २५ जानेवारी रोजी भरधाव कारने उभ्या बसला धडक दिली होती, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. ३ मे रोजी मद्यधुंद अवस्थेतील चालकाने एका तरुणाला चिरडले, तर त्याच दिवशी ब्रेक फेल झालेल्या ट्रकने तीन वाहनांना धडक देत एका दुचाकीस्वाराचा जीव घेतला. ६ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात अनेक वाहने एकमेकांवर आदळली होती, जरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, तरी नागरिकांमध्ये भीती अधिकच वाढली.

अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच

२०२३ ते २०२५ या काळातील आकडेवारी या समस्येची तीव्रता स्पष्ट करते. २०२३ मध्ये आठ अपघातांत नऊ मृत्यू झाले. २०२४ मध्ये चार अपघातांत पाच मृत्यू झाले. २०२५ मध्ये ऑक्टोबरपर्यंत १४ अपघात घडून सात जणांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे, आणि परिस्थिती अधिक धोकादायक होत चालली आहे.

अपघातानंतर उपाययोजनांची तात्पुरती मलमपट्टी

आजचा अपघात हा या साखळीतील आणखी एक दुर्दैवी दुवा आहे. दरवेळी घडणाऱ्या अशा घटनांनंतर प्रशासनाकडून तात्पुरत्या हालचाली दिसतात. पाहण्या, बैठका, अहवाल आणि आश्वासने दिली जातात. मात्र काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते आणि अपघातांची पुनरावृत्ती सुरू राहते. या सततच्या चक्रामुळे नागरिकांमध्ये प्रशासनावरील विश्वास कमी होत चालला आहे. स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवाशांचा संताप आता उघडपणे दिसून येत आहे. त्यांच्या मते, या समस्येचे निराकरण केवळ कागदोपत्री उपायांनी होणार नाही. प्रत्यक्षात रस्त्याची रचना, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाय यामध्ये मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. या भागातील मुख्य समस्या म्हणजे तीव्र उतार, अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक, स्वतंत्र सेवा रस्त्याचा अभाव आणि प्रभावी देखरेखीचा अभाव.

आज आपण सुरक्षित घरी पोहचू का?

नवले पूल हा केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवासी या सर्वांसाठी हा मार्ग अत्यंत आवश्यक आहे. मात्र दररोज या रस्त्यावरून जाताना प्रत्येकाच्या मनात भीती असते आज आपण सुरक्षितपणे पोहोचू का? दरवेळी अपघात घडल्यानंतर प्रशासन हालचाल करते, पण ती तात्पुरती ठरते. दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय मात्र अपुरे राहतात. त्यामुळे नागरिक आता केवळ आश्वासने ऐकण्यास तयार नाहीत; त्यांना प्रत्यक्ष बदल हवा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror