महापालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उद्घाटन…
पुणे महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ घटण्यामागे भारतीय जनता पक्षाचे 'निर्घृण राजकारण' आणि पैशांचा वणवा कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुणे महापालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरातील प्रश्नांसह राज्यातील ज्वलंत राजकीय मुद्द्यांवर भाजप आणि राज्य सरकारचा जोरदार पंचनामा केला.
संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, "माणसे फोडणे, विकत घेणे आणि दहशत निर्माण करणे हे भाजपचे देशव्यापी धोरण बनले आहे." पुण्यात शिवसेनेचे 'मारेकरी' कोण, असे विचारले असता त्यांनी थेट भाजपच्या कार्यपद्धतीकडे बोट दाखवले. "भाजपने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचे जाहीर वाचन त्यांनी शनिवारवाड्यासमोर करावे. भाजपचा 'थापा' मारण्याचा उद्योग आता इतका वाढला आहे की, त्याला खऱ्या अर्थाने 'राष्ट्रीय दर्जा' दिला पाहिजे," असा टोलाही त्यांनी लगावला.
पुणे शहरात भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर राऊतांनी उपरोधिक प्रहार केला. पुणेकरांनी भाजपला एकहाती सत्ता दिली आहे, असा उल्लेख करत ते म्हणाले की, "आता पुणेकरांना पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी फक्त 'नमो नमो' म्हणायचे आणि नळाला पाणी येईल, अशी स्थिती सत्ताधाऱ्यांनी निर्माण केली आहे."
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीच्या सक्तीबाबत केलेल्या 'अतिरेक' या विधानाचा राऊतांनी तीव्र निषेध केला. महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेचा आग्रह धरणे हा अतिरेक कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सरकार मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगाल दौऱ्याची आणि तिथे दिलेल्या रोजगाराच्या आश्वासनांची त्यांनी खिल्ली उडवली.
कोश्यारींपासून ते बागेश्वर बाबांपर्यंत ही सर्व भाजपची पिलावळ
पुण्यातील महापौर बंगल्यातील वृक्षतोडीला त्यांनी 'क्रूर कर्म' संबोधले. तर, सध्या चर्चेत असलेल्या 'काळ्या जादू' आणि 'अघोरी पूजे'च्या वादावर भाष्य करताना ते म्हणाले, "बोकड कापून जर माणसे मरत असती आणि सरकारे बदलत असती, तर आम्ही दिल्लीत दिवसाला शेकडो बोकड कापले असते." छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपशी संबंधित व्यक्तींकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांवर राऊतांनी संताप व्यक्त केला. "कोश्यारींपासून ते बागेश्वर बाबांपर्यंत ही सर्व भाजपची पिलावळ आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत," असे सांगत त्यांनी सरकारची शिवरायांचे नाव घेण्याची लायकी नसल्याचे कडक शब्दांत सुनावले.यावेळी संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहरप्रमुख संजय मोरे, गटनेते नितीन गावडे आणि गजानन थरकुडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

