Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune | बीआरटीचा ५०० मीटर मार्ग काढला, विश्रांतवाडी ते फुलेनगर बीआरटी पहिल्या टप्प्यापासून कामाची सुरवात.

Pune | बीआरटीचा ५०० मीटर मार्ग काढला, विश्रांतवाडी ते फुलेनगर बीआरटी पहिल्या टप्प्यापासून कामाची सुरवात.

स्थायी समितीच्या मान्यतेनंतर आयुक्तांचीही प्रशासकीय मंजुरी

पुणे : पुणे-आळंदी पालखी महामार्गावरील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या विश्रांतवाडी ते फुलेनगर बीआरटी मार्ग हटविण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

या कामाला महापालिकेच्या स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर महापालिका आयुक्तांनीही प्रशासकीय मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात विश्रांतवाडी चौक ते परुळेकर शाळा (शांतीनगर) या सुमारे ५०० मीटर लांबीच्या बीआरटी मार्गाचे निर्मूलन करण्यात आले आहे. उर्वरित मार्ग हटविण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाणार असल्याची माहिती पथ विभागाने दिली.

पुणे-आळंदी पालखी मार्ग हा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. विशेषतः विश्रांतवाडी चौक, शांतीनगर, फुलेनगर परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने वाहनचालकांना दीर्घकाळ कोंडीचा सामना करावा लागत होता. आषाढी आणि कार्तिकी पालखी सोहळ्याच्या काळात तर ही समस्या अधिक तीव्र होत असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच लोकप्रतिनिधींकडून बीआरटी हटविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.

महापालिकेने या मागणीची दखल घेत संबंधित प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर आयुक्तांची प्रशासकीय मंजुरीही प्राप्त झाली. त्यानुसार आता विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोडदरम्यानचा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा बीआरटी मार्ग टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण सहा बीआरटी बसस्थानकांचा समावेश आहे.

Pune : जलकुंभांचे कोरडे लोकार्पण; महंमदवाडी, उंड्रीत पाण्यासाठी नागरिकांची अजूनही वणवण…

पहिल्या टप्प्यात पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारा विश्रांतवाडी चौक ते परुळेकर शाळा (शांतीनगर) हा सुमारे ५०० मीटरचा भाग हटविण्यात आला. यामध्ये साठे बिस्कीट बीआरटी बसस्थानक पूर्णपणे काढण्यात आले आहे. तसेच दोन्ही बाजूंना असलेले सुमारे २५० मीटर लांबीचे आरसीसी लेन सेपरेटर हटविण्यात आले असून सुमारे ७५० मीटर लांबीचे लोखंडी ग्रील सेपरेटरही काढण्यात आले आहेत. याशिवाय ३५ मीटर लांब व चार मीटर रुंद बीआरटी बसस्थानकाचेही निर्मूलन करण्यात आले आहे.

बीआरटी हटविल्यानंतर या ठिकाणी वाहनांसाठी अतिरिक्त रस्ता उपलब्ध झाल्याने वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. विशेषतः विश्रांतवाडी चौकातून विमाननगर, येरवडा, आळंदी, भोसरी तसेच शहराच्या मध्यवर्ती भागाकडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

संपूर्ण मार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होईल

गेल्या काही वर्षांत शहरातील अनेक बीआरटी मार्गांबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. काही ठिकाणी बीआरटी मार्गामुळे सार्वजनिक वाहतुकीला अपेक्षित गती मिळाली नाही, उलट मुख्य रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडी वाढत असल्याची टीका नागरिकांकडून होत होती. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरणारे बीआरटी कॉरिडॉर हटवून रस्ते अधिक खुले करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी ते फुलेनगर या उर्वरित बीआरटी मार्गाचे निर्मूलनही नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण मार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होईल, तसेच नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी होण्यास मोठी मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror