Dailyhunt
Pune | बुधवारपेठेत टाकलेल्या छाप्यात १५ बांगलादेशी ताब्यात, मध्यरात्री पोलिसांनी केली दोन इमारतींवर कारवाई.

Pune | बुधवारपेठेत टाकलेल्या छाप्यात १५ बांगलादेशी ताब्यात, मध्यरात्री पोलिसांनी केली दोन इमारतींवर कारवाई.

वेश्याव्यवसायातील १८ जणांना पकडले

पुणे : बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसायासाठी कथितरित्या वापरल्या जाणाऱ्या दोन इमारतींवर फरासखाना पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १५ बांगलादेशींसह १८ जणांना ताब्यात घेण्यात आले.

सोमवारी (दि. २७) रात्री ११.३० वाजता सुरू झालेली ही मोहीम दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती, यात महिला आणि पुरुष अशा १५ बांगलादेशी नागरिकांसह १८ जणांना ताब्यात घेण्यात आले. अवैध वेश्याव्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील कुख्यात 'डिस्को बिल्डिंग' आणि 'माचिस बिल्डिंग' येथे ही धाड टाकण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस पथकांनी मध्यरात्रीच्या या ऑपरेशनदरम्यान दोन्ही इमारतींच्या अनेक मजल्यांवर एकाच वेळी शोध घेतला. माचिस बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून वेश्याव्यवसाय चालवला जात होता. या धाडीत १५ ते ३० वयोगटातील ११ महिला वेश्याव्यवसायात गुंतलेल्या आढळल्या, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी 'सीविक मिरर'ला दिली.

कारवाईदरम्यान खालील संशयित पुरुष आणि महिलांना ताब्यात घेण्यात आले. ज्योती उर्फ सबिना अस्लम शेख (४०) ही कथितरित्या अक्का म्हणून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत होती. समीर मुस्तफा हलवादार (२९) आणि राहुल शर्मा (२४) हे दोघे मॅनेजर म्हणून कामकाज हाताळत होते. पोलीस खात्यातील सूत्रांनुसार, सुमित मिलिंद चव्हाण (३३) हा दोन्ही इमारतींमध्ये चालणाऱ्या या नेटवर्कमागील मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या रॅकेटचा विस्तार किती आहे आणि आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे दुवे यात आहेत का, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

'सीविक मिरर'ने संपर्क साधला असता परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी या कारवाईला दुजोरा दिला. शहरात बेकायदेशीर वेश्याव्यवसाय आणि अवैधपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहील, असे स्पष्ट केले.

मोबाईल आणि हिशोबाच्या डायऱ्या जप्त

या कारवाईत पोलिसांनी आरोपींनी दळणवळण आणि समन्वयासाठी वापरलेले अनेक मोबाईल फोन जप्त केले. तसेच, घटनास्थळावरून हिशोबाच्या डायऱ्यादेखील पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांमधून अवैध कामांमध्ये गुंतलेल्या मोठ्या नेटवर्कचे आर्थिक व्यवहार आणि तपशील समोर येतील, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी 'सीविक मिरर'कडे व्यक्त केला.

बुधवार पेठ आणि इतर भागांत चालणाऱ्या संघटित अवैध कृत्यांविरुद्ध आम्ही कारवाई तीव्र केली आहे. मध्यरात्रीच्या धाडीत बांगलादेशी नागरिकांसह अनेकांना चौकशी आणि पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मानवी तस्करीच्या संभाव्य बाजूंचा आम्ही तपास करत आहोत.
- कृषिकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

बांगलादेशी अल्पवयीन मुलीचाही समावेश

या कारवाईदरम्यान एका १५ वर्षांच्या बांगलादेशी अल्पवयीन मुलीचीदेखील सुटका करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला संरक्षणामध्ये ठेवण्यात आले असून, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा आणि संबंधित कलमांखाली आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror