पुणे : भुसारी कॉलनीतील टीव्हीएस शोरूमसमोरील पीएमपीएमएल बसथांब्याजवळ अनेक दिवसांपासून पावसाचे पाणी आणि चिखल साचल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप कोथरूड सिटिझन फोरमने (केसीएफ) केला आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदार संघाची अवस्थ बिकट असल्याचे यावरून बघायला मिळत आहे.
या बसथांब्याचा दररोज ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि नोकरदार मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, साचलेल्या पाण्यामुळे बसचालकांना बस थांब्यालगत उभी करता येत नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या बसमध्ये चिखल आणि पाण्यातून वाट काढत चढावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भरधाव वाहनांमुळे साचलेले घाण पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ड्रेनेज व्यवस्था आणि रस्त्याच्या उताराबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
महापालिकेच्या पथ विभाग, ड्रेनेज विभाग आणि पीएमपीएमएलने संयुक्त पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कोथरूड सिटिझन फोरमने केली आहे.

