Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Crime | मिरची स्प्रे फवारून कॅशियरला लुटले, दुचाकीसह ८ लाख ६ हजार ४८० रुपये किमतीचा ऐवज केला लंपास.

Pune Crime | मिरची स्प्रे फवारून कॅशियरला लुटले, दुचाकीसह ८ लाख ६ हजार ४८० रुपये किमतीचा ऐवज केला लंपास.

सिंहगड रस्त्यावरील सेवा रस्त्यावर चार दरोडेखोरांनी लंपास केले आठ लाख सहा हजार; रोख रक्कम असलेली दुचाकीच पळवली

पुणे : सिंहगड रस्त्यावरील कात्रज-देहूरोड बायपासच्या सेवा रस्त्यावर चार अज्ञात दरोडेखोरांनी एका कॅशियरच्या चेहऱ्यावर मिरची स्प्रे फवारून रोख रक्कम आणि दुचाकीसह रुपये ८ लाख ६ हजार ४८० किमतीचा ऐवज लुटल्याची घटना रविवारी (दि.२६) रात्री घडली.

आरोपींनी रोख रक्कम असलेली दुचाकीच पळवून नेल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांना संशय आहे.

नऱ्हे येथील हौसकुमार इंगळे (वय ४२) हे डीएसपी वाईन शॉपमधील दिवसाची रोख वसुली घेऊन पिंपरी-चिंचवडमधील दांगे चौक परिसरातील दुसऱ्या मद्यविक्री केंद्राच्या मालकाकडे जात होते. रात्री सुमारे १०.५५ वाजता वडगाव बुद्रुक येथील प्रयाग सिटी ते वारजेदरम्यानच्या सेवा रस्त्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्यांचा मार्ग अडवला.

इंगळे यांनी रुपये ७ लाख ७६ हजार ४८० रोख रक्कम पांढऱ्या पिशवीत ठेवून ती त्यांच्या होंडा ॲक्टिव्हाच्या डिकीत ठेवली होती. आरोपींपैकी एकाने त्यांच्या चेहऱ्यावर मिरची स्प्रे फवारल्याने ते काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत गेले. त्यानंतर आरोपींनी रोख रक्कम असलेली दुचाकी पळवून नेली. जाताना त्यांनी इंगळे यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने?

आरोपींनी कॅशियरचा आधीपासून पाठलाग केल्याचा संशय.
मद्यविक्री केंद्रापासून घटनास्थळापर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू.
आरोपींनी वापरलेल्या दुचाकींची ओळख पटविण्याचे प्रयत्न.
कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि अन्य तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण.
रोख रक्कम वाहून नेली जात असल्याची आरोपींना पूर्वमाहिती होती का, याचाही तपास.

Crime | पिंपरी चिंचवडमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती, ६५ वर्षीय वृध्दाकडून सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर अत्याचार…

लुटीतील ऐवज

रोख रक्कम : रुपये ७ लाख ७६ हजार ४८०
होंडा ॲक्टिव्हा दुचाकी : अंदाजे रुपये ३० हजार
एकूण नुकसान : रुपये ८ लाख ६ हजार ४८०

इंगळे यांनी सोमवारी सकाळी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर चार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून रोख रक्कम आणि दुचाकी हस्तगत करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror