पुणे : आगामी Pune Crime News दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील आरोपी तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी कारवाई करत देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड जप्त करून दोन जणांना अटक केली.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सुधीर शिवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. ऋषीकेश वामन भोरडे (वय २७) आणि प्रणव संदिप भोरडे (वय १९), दोघेही रा. पिंपरी सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांच्याकडे पिस्तूल असून त्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी वाडेबोल्हाई येथील मोकळ्या माळरानात रात्रीच्या वेळी पिस्तूलमधून राऊंड फायर करण्याचा सराव केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत तपास केला. चौकशीत आरोपींनी वाडेबोल्हाई येथील मोकळ्या माळरानात पिस्तूलमधून राऊंड फायर करण्याचा सराव केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड पंचनाम्याने जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अविनाश कुमार सोंळे आणि सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे सोंळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, तपास पथकाचे सपोनि गजानन कागणे तसेच पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सागर जगताप, संतोष अंद्रे, म्हातारी सपुरे, सुधीर शिवले, दिनेश नरफकुंड, सागर वाळके, अजिंक्य दमडे आणि लोणीकंद पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

