भवानी पेठेतील ऐतिहासिक बालाजी मंदिरातील सुमारे पाच किलो चांदीचे दागिने केले होते लंपास…
पुणे : पुण्यातील भवानी पेठ येथील ऐतिहासिक श्री बालाजी मंदिरात पुजाऱ्याचे सोंग घेऊन भाविक आणि ट्रस्टचा विश्वास संपादन करत सुमारे पाच किलो चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोराला खडक पोलिसांनी अखेर बिहारमधून अटक केली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या तीन राज्यांमध्ये सलग पाठलाग करून पोलिसांनी ही धडक कारवाई केली. आरोपीकडून चोरीस गेलेले ४.९५५ किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
राजेश पांडे ऊर्फ राजेश महतो (वय ४२, रा. कटिहार, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इतर राज्यांतील मंदिरांमध्ये त्याने याच पद्धतीने गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी बालाजी मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपी राजेश पांडे हा स्वतःला देशभर फिरणारा धार्मिक पुजारी असल्याचे भासवून मंदिरात आला होता. भगवान बालाजीची सेवा करण्यासाठी काही महिने राहण्याची परवानगी त्याने मंदिर प्रशासनाकडे मागितली होती. पुढील १५ दिवस तो इतर पुजाऱ्यांसोबत दैनंदिन पूजाअर्चा आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी झाला. या काळात त्याने सर्वांचा विश्वास संपादन केला. मात्र, या १५ दिवसांत त्याने मंदिराची दिनचर्या, पुजाऱ्यांच्या झोपण्याची जागा, चाव्या कुठे ठेवल्या जातात आणि सुरक्षेची व्यवस्था कशी आहे, याची अत्यंत बारकाईने रेकी केली.
१२ जुलैच्या मध्यरात्री (पहाटे २:३० च्या सुमारास) सर्वजण गाढ झोपेत असताना आरोपीने गुपचूप गाभाऱ्याची चावी घेतली. कुलूप उघडून देवाच्या मूर्तीवरील सुमारे पाच किलो वजनाचे सर्व चांदीचे अलंकार गोळा केले आणि पसार झाला. सकाळी पूजा करण्यासाठी आलेल्या पुजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात आरोपी चोरी करताना स्पष्टपणे दिसून आला.
दरम्यान, अटकेनंतर आरोपीला कटिहार येथील मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर आरोपीला पुण्यात आणण्यात आले. पुण्यातील न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीसा १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या चोरीस गेलेल्या उर्वरित मालाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, आरोपीने इतर राज्यांतील मंदिरांमध्येही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचाही तपास सुरू आहे.
तीन राज्यांत थरारक पाठलाग
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन झोन-१ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आणि खडक पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी पुणे रेल्वे स्थानकावरून ट्रेनमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलीस रेल्वेचा माग काढेपर्यंत ती रेल्वे कर्नाटकाच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल लोकेशनवर लक्ष ठेवले. आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी वारंवार मोबाईल फोन चालू-बंद करत होता. तांत्रिक विश्लेषणातून तो विजयवाडामार्गे बिहारला पोहोचल्याचे स्पष्ट झाले. तपासात आरोपी कटिहार जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बांकर, पोलीस अंमलदार दिनेश गायकवाड आणि कृष्णा गायकवाड यांचे विशेष पथक तातडीने बिहारला रवाना करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आमच्या पथकाने बिहारमध्ये पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे. सुमारे पाच किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने ओळख लपवण्यासाठी वारंवार वेषांतर केले. त्याने इतर राज्यांतील मंदिरांमध्येही अशा प्रकारे चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास सध्या सुरू आहे.
- ऋषिकेश रावले, पोलीस उपायुक्त (झोन-१)
वेष बदलून देत होता पोलिसांना चकवा
महाराष्ट्र पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपीने आपला पेहराव बदलला आणि तो साधूच्या वेषात कटिहार, पूर्णिया, अररिया, राणीगंज आणि जमुई या जिल्ह्यांमध्ये सतत ठिकाणे बदलत राहिला. सुमारे १० ते १२ दिवस पोलिसांनी त्याच्या मागावर राहून २६ जुलै रोजी जमुई जिल्ह्यातील सिकंदरा तालुक्यातील पतांबर गावातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. चोरीचा माल विकण्याच्या उद्देशाने आरोपीने चांदीच्या दागिन्यांचे लहान-लहान तुकडे केले होते. अटकेनंतर त्याला कटिहार न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून पुण्यात आणण्यात आले आहे. पुण्यातील न्यायालयाने आरोपीला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चोरी केलेली चांदी तुकडे करून विकण्याचा प्रयत्न
२६ जुलै रोजी जमुई जिल्ह्यातील सिकंदरा तालुक्यातील पतांबर गावातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याच्याकडून ४.९५५ किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. त्यापैकी अनेक दागिन्यांचे तुकडे करण्यात आले होते. चोरीचा माल विकण्यासाठी आरोपीने हे दागिने कापल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

