डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणेकर रस्त्यावर; डीजे, लेझर आणि प्लाझ्मा लाईट्सवर बंदीची जोरदार मागणी
पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे, प्लाझ्मा, लेझर लाईट्स आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांमुळे (लाउडस्पीकर) होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाविरोधात पुण्यातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
'सुजाण पुणेकर' या व्यासपीठाच्या वतीने रविवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता डेक्कन परिसरातील गुडलक चौकात 'डीजेमुक्त गणेशोत्सव' संकल्पनेअंतर्गत एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात 'अब की बार लाउडस्पीकर हद्दपार' हा संदेश असलेला बॅनर लक्षवेधी ठरला.
उपस्थित नागरिकांनी डीजे संस्कृती आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आपली ठाम भूमिका मांडली. यावेळी उपस्थितांच्या हातात विविध प्रबोधनात्मक संदेश असलेले फलक पहायला मिळाले. त्यापैकी 'अब की बार लाउडस्पीकर हद्दपार' हा संदेश असलेला बॅनर उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. या अनोख्या आंदोलनातून पुणेकरांनी मोठ्या आवाजातील लाउडस्पीकर, डीजे आणि धोकादायक लेझर लाईटविरोधात आपला रोष व्यक्त केला.
मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, असा दावा उस्थितांनी केला. तसेच देशात ध्वनिप्रदूषणासंदर्भात कायदे आणि नियम अनेक वर्षांपासून अस्तित्वात असतानाही प्रशासनाकडून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.
एका नागरिकाने आपल्या कुटुंबातील अत्यंत दुर्दैवी आणि वैयक्तिक अनुभवाचा पुनरुच्चार केला. मोठ्या आवाजातील स्पीकरचा त्रास कमी करण्याची विनंती वारंवार करूनही ती धुडकावली जात आहे माझ्या आजोबांचा मृत्यू याच साउंडच्या आवाजामुळे झाल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न हा आपल्यासाठी केवळ एक सामाजिक किंवा सार्वजनिक मुद्दा नसून तो अत्यंत वैयक्तिक वेदनेशी जोडलेला आहे, असे सांगताना ते भावूक झाले.
या प्रबोधन सभेतून पुणेकरांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागण्या मांडल्या आहेत. डीजे, अती-तीव्रतेचे प्लाझ्मा व डोळ्यांना इजा पोहोचवणारे लेझर लाईट्स यांच्यावर तातडीने पूर्ण निर्बंध आणावे आणि यंदाचा गणेशोत्सव अधिक आरोग्यदायी, सुरक्षित तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन 'सुजाण पुणेकर' यांच्या वतीने पोलीस आणि महापालिका प्रशासनाला करण्यात आले आहे.
कुठल्याही सणाला पारंपारिक पद्धतीने साजरा करणे गरजेचे आहे. डीजेला काही पारंपारिक वारसा नाही पूर्वी ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हायचा त्या पद्धतीने गणेशोत्सव आता साजरा होत नाही"
- सामान्य नागरिक
लोकमान्यांचा उत्सव आणि आताचा यात तफावत
गणेशोत्सवाच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक स्वरूपाचा उल्लेख करताना "गणेशोत्सवाची मूळ परंपरा आणि आजची डीजे-स्पीकर संस्कृती यांची सरमिसळ केली जाऊ नये. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता, त्याचा उद्देश आणि आजच्या मोठ्या आवाजाच्या उत्सवपद्धतीतील वास्तव यात खूप मोठा फरक आहे." असे जागरुक पुणेकरांनी सांगितले. डीजे किंवा मोठ्या आवाजाला विरोध करणाऱ्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवर किंवा प्रत्यक्ष व्यवहारात 'देशद्रोही' किंवा 'उत्सवविरोधी' ठरवण्याच्या विकृत प्रवृत्तीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. चांगल्या व जनहिताच्या गोष्टींसाठी आवाज उठवणाऱ्या नागरिकांना विरोधक किंवा देशद्रोही ठरवणे पूर्णपणे अयोग्य आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
गणपती मंडळांचे अश्लील गाणी लावून त्यावर नाचणे आक्षेपार्हआहे. डीजे वाजवत असाल तर वर्गणी देणार नाही, ही अट सार्वजनिक मंडळांना घातली पाहिजे.
- सामान्य नागरिक
गणेशोत्सवाला विरोध नाही, पण डीजे संस्कृती अमान्य
मी कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संघटनेशी संबंधित नसून एक सामान्य नागरिक म्हणून या मोहिमेत सहभागी झालो आहे. गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा उत्सव आहे. त्यामुळे डीजे, उच्च क्षमतेचे स्पीकर आणि आरोग्यास घातक ठरणाऱ्या गोष्टींना विरोध करण्याची सुरुवात गणेशोत्सवापासूनच व्हायला हवी.
मी लहान असताना गणपती पाहायला जायचो. पण माझ्या मुलांना बाहेर जाऊन गणपती पाहायला आवडत नाही. कारण त्यांना इतक्या मोठ्या आवाजाची सवय नाही आणि त्यांना असुरक्षितही वाटते.
- सामान्य नागरिक
आमचा विरोध सात्विक पारंपारिक गणेशोत्सवाला मुळीच नाही; आम्ही स्वतःही गणेशभक्त आहोत. मात्र, गणेशोत्सवाच्या नावाखाली मोठ्या आवाजात डीजे किंवा स्पीकर वाजवण्याचे अजिबात समर्थन करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया या आंदोलनात सहभागी झालेले पुणेकर मिलिंद नाईक यांनी 'सीविक मिरर'कडे व्यक्त केली.

