Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे हादरले ! श्रावणात मटण अन् दारूसाठी मुलाचा हट्ट; संतापेल्या वडिलांनी केली हत्या

पुणे हादरले ! श्रावणात मटण अन् दारूसाठी मुलाचा हट्ट; संतापेल्या वडिलांनी केली हत्या

Pune : पुण्यातील वारजे-माळवाडी परिसरातील रामनगर भागात एक थरारक घटना समोर आली आहे. श्रावण महिन्यात दारूच्या नशेत घरी येऊन मटणाची मागणी केल्यावरून झालेल्या वादात वडिलांनीच मुलाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी वारजे-माळवाडी पोलिसांनी मृत तरुणाचे वडील आणि आई या दोघांनाही अटक केली आहे.

महेश भागवत गायकवाड (३०) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (६०) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, पतीच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची पूर्ण माहिती असतानाही आईने ही गंभीर घटना लपवली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश गायकवाड याला दारूचे व्यसन होते आणि तो काहीच काम करत नव्हता. त्याच्या याच व्यसनामुळे त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली होती. घटस्फोटानंतर तो एकटाच राहत असून जेवणासाठी आई-वडिलांकडे जात असे. २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते पहाटे चार दरम्यान महेश दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आई-वडिलांकडे मटणाच्या कालवणाची हट्टाने मागणी केली.

मात्र, श्रावण महिना सुरू असल्याने घरात मांसाहार केला जात नाही, असे त्याला समजावण्यात आले. यावरून पिता-पुत्रामध्ये वाद विकोपाला गेला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले आणि संतप्त वडिलांनी महेशच्या डोक्यावर व तोंडावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे महेशचा जागीच मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही आई पार्वती गायकवाड हिने शेजाऱ्यांना किंवा पोलिसांना कोणतीही कल्पना दिली नाही. उलट पतीला वाचवण्यासाठी तिने घटनास्थळावरील पुरावे नष्ट केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

महेशच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी वृद्ध आई-वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror