पुणे : एनआयबीएम, महंमदवाडी, उंड्री, दोराबजी पॅराडाईज परिसरातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मे महिन्यात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या नऊ नव्या जलकुंभांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
त्याला दीड महिना उलटूनही नऊपैकी तीन जलकुंभांअंतर्गत येणाऱ्या भागांना अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्क-इंद्रायू परिसरातील दोन पैकी एक , न्याती आणि शिवनेरी या तीन जलकुंभांअंतर्गत येणाऱ्या वितरण व्यवस्थेची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांना नवीन योजनेचा लाभ मिळालेला नाही. उद्घाटनानंतर काही दिवसांतच नवीन जलकुंभांमधून पाणीपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही अनेक भागांमध्ये जुनीच परिस्थिती कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
महापालिकेचे पाणीपुरवठाप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाअंतर्गत वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून १४ किलोमीटर लांबीच्या मुख्य दाबनलिका टाकण्यात आल्या असून, दोन ते तीन दशलक्ष लिटर क्षमतेच्या एकूण १७.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या नऊ जलकुंभांची उभारणी करण्यात आली आहे. या नऊ टाक्यांद्वारे सहा पाणीपुरवठा झोन कार्यान्वित होणार असून सुमारे ३३ किलोमीटर वितरण जलवाहिनीचे जाळे विकसित करण्यात आले आहे. या सुविधेमुळे सुमारे तीन लाख नागरिकांना लाभ होणार असून दोन लाख नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा आणि एक लाख नागरिकांना अजिबात पाणीपुरवठा होत नसल्याची समस्या दूर होणार असल्याचा दावा महापालिकेने केला होता. तसेच दररोज २५० ते ३०० खासगी आणि महापालिकेचे पाण्याचे टँकर बंद होतील, असेही त्यांनी सांगितले.
Pune | पहिल्याच पावसात एसटीचे वाभाडे, स्वारगेटसह-वाकडेवाडी बसस्थानकांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य….
Make Civic Mirror My Trusted Source
या नऊ जलकुंभांच्या लोकार्पणाला विशेष महत्त्व होते. कारण दोराबजी पॅराडाईज, एनआयबीएम रोड, महंमदवाडी, उंड्री, तरवडे वस्ती, कोनार्क-इंद्रायू आणि आसपासच्या परिसरात अनेक वर्षांपासून कमी दाबाने पाणी येणे, अनियमित पाणीपुरवठा आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येत होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. त्यासाठी वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात नवीन उच्च क्षमतेचे चार विद्युत पंप बसविण्यात आले, नवीन मुख्य दाबनलिका टाकण्यात आल्या आणि संपूर्ण वितरण व्यवस्था नव्याने उभारण्यात आली. या भागासाठी जलशुद्धीकरण केंद्रापासून वितरण यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे ७६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, भविष्यात या भागातील टँकरची गरज जवळपास संपुष्टात येईल, असा दावा महापालिकेने केला होता.
'जेसीबी'मुळे झाला घोळ
महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेत नव्या जलवाहिन्या, वितरण व्यवस्था आणि झोन आयसोलेशनची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असताना पथ विभागाने रस्त्यांच्या कामांसाठी अनेक ठिकाणी खोदकाम केले होते. या खोदकामादरम्यान जेसीबीने भूमिगत जलवाहिन्यांना धक्का बसल्याने त्या अनेक ठिकाणी फुटल्या. जनलवाहिन्या भूमिगत असल्याने सुरुवातीला हा प्रकार लक्षात आला नव्हता. मात्र नव्या टाक्यांमधून दाबाने पाणी सोडल्यानंतर विविध ठिकाणी गळती सुरू झाल्याने ही बाब उघडकीस आली. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी गळती शोधणे, उत्खनन करून जलवाहिन्या दुरुस्त करणे आणि पुन्हा चाचणी घेणे या प्रक्रियेत मोठा कालावधी खर्ची पडत आहे. परिणामी, उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब झाला आहे.
जुनीच समस्या कायम
या प्रकल्पाची पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. पुणे शहरासाठी सुमारे २,८१८ कोटी रुपयांची समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून शहरातील पाणीपुरवठ्यातील असमानता दूर करणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. शहराच्या भौगोलिक रचनेमुळे काही भागांत जास्त दाबाने तर काही भागांत अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे कमी दाब, अनियमित वेळा, दूषित पाणी आणि टँकरवरील अवलंबित्व अशा तक्रारी सातत्याने येत होत्या. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नवीन जलकुंभ, वितरण जाळे, स्मार्ट मीटर आणि आधुनिक पंपिंग व्यवस्था उभारण्यात येत आहे.
मात्र प्रत्यक्षात तीन जलकुंभांतर्गत येणाऱ्या भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांतच नियमित पाणी मिळेल, या अपेक्षेने अनेकांनी टँकरवरील अवलंबित्व कमी करण्याची तयारी केली होती. मात्र जलवाहिन्यांमधील गळती, जुन्या पाइपलाइनचे तांत्रिक दोष, झोन आयसोलेशनची प्रक्रिया आणि विशेषतः पथ विभागाच्या खोदकामामुळे फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे सर्व नियोजन विस्कळीत झाले. त्यामुळे उद्घाटनानंतरही नागरिकांना जुन्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
…तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू करणे अशक्य
महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, या विलंबामागे इतर काही तांत्रिक कारणेही आहेत. अनेक भागांतील जुन्या जलवाहिन्यांमध्ये वर्षानुवर्षे गाळ साचलेला असल्याने तो एकाच वेळी काढणे शक्य नसते. टप्प्याटप्प्याने स्वच्छता करावी लागत आहे. त्याचबरोबर जुन्या जलवाहिन्या वापरण्यायोग्य असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले तरी नव्या योजनेत अधिक दाबाने पाणी सोडल्यानंतर त्या काही ठिकाणी फुटत आहेत. त्यामुळे अशा वाहिन्यांची दुरुस्ती किंवा बदल करण्याचे कामही समांतर सुरू आहे.
महापालिकेने पूर्ण तयारी करूनच लोकार्पण करावयास हवे होते. घाईगर्दीत झालेले काम गुणवत्तापूर्ण असेल का, अशी शंका येते.
- शेख सुलेमान अन्सारी, कोंढवा खुर्द
याशिवाय अनेक ठिकाणी जुन्या आणि नव्या समांतर जलवाहिन्या अस्तित्वात आहेत. त्यापैकी कोणती वाहिनी कायम ठेवायची आणि कोणती बंद करायची, यासाठी झोन आयसोलेशनची प्रक्रिया राबवावी लागत आहे. योग्य जलवाहिनी निश्चित करून इतर वाहिन्या बंद करण्यासाठीही वेळ लागत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्प पूर्णत्वास गेला असला तरी वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत पाणीपुरवठा सुरू करणे शक्य होत नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे.
महापालिका म्हणते, पंधरवड्यात कामे पूर्ण करू
पाणीपुरवठा विभागाकडून या विलंबाचे मुख्य कारण पथ विभागाच्या खोदकामादरम्यान जलवाहिन्यांचे झालेले नुकसान असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, उद्घाटनापूर्वी सर्व चाचण्या आणि विभागांमधील समन्वय पूर्ण झाला होता का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. उद्घाटन झाल्यानंतरही प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू न झाल्याने प्रकल्पाच्या नियोजन आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेने अगोदरच खूप विलंब केला आहे. लोकार्पणानंतर पाणी मिळेल, असे वाटले होते. पण अजून तरी भ्रमनिरासच होत आहे.
- शेखर गायकवाड, क्लाऊड नाइन परिसर
तथापि, पाणीपुरवठा विभागाने आश्वासन दिले आहे की कोणार्क-इंद्रायू, न्याती आणि शिवनेरी या तीन जलकुंभांअंतर्गत उर्वरित सर्व तांत्रिक कामे येत्या पंधरवड्यात पूर्ण केली जातील. त्यानंतर संबंधित भागातील नागरिकांना नव्या योजनेअंतर्गत नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. विभागाच्या या दाव्याकडे आता हजारो नागरिकांचे लक्ष लागले असून, दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नळातून नियमित पाणी कधी येणार, याचीच उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

