पुणे : कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट हस्तक्षेप करत पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रकल्पाच्या संथगतीमुळे नॉर्थ मेन रोडवर वाहतूक कोंडी तीव्र होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पोलीस आयुक्तांनी कंत्राटदार आणि अंमलबजावणी करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस महापालिका आयुक्तांकडे केल्याने या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.
दोन्ही आयुक्तांच्या दाव्यात तफावत
या उड्डाणपुलाचे काम जून २०२४ मध्ये सुरू झाले. ते १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे २२ महिने उलटूनही प्रकल्प अपूर्णच आहे. पोलीस आयुक्तांच्या पत्रानुसार, आतापर्यंत केवळ ४० ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसरीकडे, महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी मात्र प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. तसेच कामाच्या विलंबाबाबत कंत्राटदाराला आवश्यक ती मदत दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उड्डाणपुलाच्या विलंबामुळे वाहतूक कोंडीत भर
कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडत असल्यामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
या पत्रात अमितेश कुमार यांनी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे नॉर्थ मेन रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यावर आपली भूमिका मांडताना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी पुढील दोन महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी उड्डाणपूल हा ५० वर्षांहून अधिक जुना असून, कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे हा पूल धोकादायक ठरत असल्याचे तांत्रिक तपासणीत स्पष्ट झाले होते. मार्च २०१८ मध्ये शहरातील जुन्या पुलांचे तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेल्या अहवालात या पुलाची अवस्था चिंताजनक असल्याचे नमूद करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेत ८३ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला. या कामाचे कंत्राट एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना ५६ कोटी १८ लाख रुपयांच्या बोलीसह देण्यात आले, तर प्रत्यक्ष काम कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चरकडून केले जात आहे. हा सुमारे ५०० मीटर लांबीचा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या जुन्या पुलाच्या जागी नव्याने उभारला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे, थेट पोलीस आयुक्तांना हस्तक्षेप करावा लागणे. यामुळे पुणे महापालिकेच्या नियोजन आणि अंमलबजावणी क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेळेत निर्णय न घेणे, विभागांमधील समन्वयाचा अभाव आणि कामाच्या गतीवर नियंत्रण न ठेवणे, या बाबी समोर येत आहेत. सध्या महापालिकेकडून प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात काम किती वेगाने पूर्ण होते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कामाबाबत पुणेकरांना दिलासा देण्यासाठी केवळ आश्वासन नव्हे, तर ठोस आणि वेगवान अंमलबजावणीची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाण्याची पाईपलाईन विलंबामागील महत्वाचे कारण
एक मीटर व्यासाची पाण्याची पाईपलाईन स्थलांतरित करण्याच्या कामात झालेल्या विलंबामुळे प्रकल्प अडकून पडला आहे. तसेच, कंत्राटदाराने विविध विभागांशी आवश्यक पाठपुरावा न केल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पाईपलाईन स्थलांतराचे काम लवकरच पूर्ण होईल आणि पुढील दोन महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापालिकेका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले. तसेच, कामाच्या विलंबाबाबत कंत्राटदाराला आवश्यक ती मदत दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
ट्रॅफिक वॉर्डनची अनुपस्थिती
येथे वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. कामाच्या ठिकाणी कोणताही ट्रॅफिक वॉर्डन तैनात नसल्याने नॉर्थ मेन रोडवर वाहतूक कोंडी वाढली आहे. यामुळे दररोज हजारो वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होत असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
१८ महिन्यांचे काम २२ महिने उलटूनही अपूर्णच; कामाच्या प्रगतीबाबत दोन्ही आयुक्तांच्या दाव्यात तफावत
या उड्डाणपुलाचे काम जून २०२४ मध्ये सुरू झाले. ते १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, २२ महिने उलटूनही प्रकल्प अपूर्णच आहे. पोलीस आयुक्तांच्या पत्रानुसार, आतापर्यंत केवळ ४० ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसरीकडे, महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी मात्र प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्रगतीच्या आकडेवारीत मोठा तफावत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या विरोधाभासामुळे प्रकल्पाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाहतूक कोंडीमुळे महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी
दरम्यान, या प्रकल्पामुळे कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मुख्य रस्त्यांवर सतत कोंडी होत असून, स्थानिक रहिवासी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आणि स्थानिक स्तरावर महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. प्रकल्प लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले की, कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी उड्डाणपुलाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. "पाईपलाईनचे स्थलांतर लवकरच होईल, आणि त्यानंतर आम्ही पुढील दोन महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत," असे ते म्हणाले. त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले की पूल पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. आयुक्तांनी कामाच्या विलंबामुळे झालेली गैरसोय लक्षात घेता कंत्राटदारास वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सर्व मदत देत असल्याचेही स्पष्ट केले.
कामाच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांचा तसेच प्रवाशांचा संतापही आता उफाळून येत आहे. या मार्गज्ञवरून नियमित प्रवास करणारे नागरिक आशिष शिंदे 'सीविक मिरर'कडे संतप्त प्रतिक्रिया देताना म्हणाले, "प्रकल्प सुरू करताना मोठमोठे दावे केले जातात, पण कामाची कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. वाहतुकीवरचे निर्बंध आम्ही सहन करतो आहोत, पण प्रशासनाचे उत्तरदायित्व कुठे आहे? ते आपली काम वेळत पार पाडत नाही, याला जबाबदार कोण?"

