राजमाता जिजाऊ उड्डाणपुलासह स्कायवॉकवर पडणार हातोडा, करदात्यांचे १४० कोटी पाण्यात?
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मैलाचा दगड ठरणाऱ्या निगडी ते चाकण मेट्रो प्रकल्पाचा सुधारित आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे.
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सूचनांनुसार महामेट्रोने या मार्गात मोठे बदल केले असून, आता हा मार्ग भोसरी गावातून जाणार आहे. मात्र, या बदलामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल २,५०० कोटी रुपयांनी वाढला असून, भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलासह इतर काही बांधकामे पाडावी लागणार आहेत.
सुधारित आराखड्यानुसार, निगडी ते चाकण या ४७.२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गासाठी आता १२ हजार ९३७ कोटी २३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पूर्वी हा खर्च १० हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये होता. मार्गातील बदल आणि स्थानकांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे हा खर्च सुमारे २,५०० कोटींनी वाढला आहे. या मार्गावर पूर्वी ३१ स्थानके होती, ती आता ३४ करण्यात आली आहेत.
मेट्रोचा नवा मार्ग भोसरी गावातून नेण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडणे आवश्यक असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. २०११ मध्ये पालिकेने सुमारे १०० कोटी खर्चून हा पूल बांधला होता. त्यासोबतच सात कोटींचा शीतलबाग स्कायवॉक आणि ३८ कोटींचे अर्बन स्ट्रीटचे कामही मेट्रोसाठी पाडावे लागणार आहे. यामुळे करदात्या नागरिकांचे सुमारे १४० कोटी रुपये पाण्यात जाणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर हा आराखडा राज्य व केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
असा असेल नवा मार्ग
नाशिक फाट्यावरून ही मेट्रो वल्लभनगर, टेल्को रस्ता, लांडेवाडी आणि भोसरी गावातून पुढे चाकणकडे वळवण्यात आली आहे. हा मार्ग निगडी (भक्ती-शक्ती चौक), रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, गवळीमाथा, मोशी ते चाकण या महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दररोज सुमारे ३ लाख ३२ हजार प्रवासी या मेट्रोने प्रवास करू शकतील, अशी या मार्गाची क्षमता असेल.
औद्योगिक क्षेत्राला मोठा आधार
पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या आणि चाकणचा औद्योगिक विस्तार लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. चाकण एमआयडीसी थेट मेट्रोने जोडली गेल्यामुळे कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास सुलभ होणार आहे. तसेच स्थानकांच्या परिसरात वाहनतळाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महामेट्रोकडून प्रवासी संख्येचा अंदाज (वर्ष - दैनंदिन अंदाजे प्रवासी)
२०३२ पर्यंत - ३.२२ लाख
२०४२ पर्यंत - ५.०९ लाख
२०५२ पर्यंत - ६.६९ लाख
२०६२ पर्यंत - ७.८० लाख
सुधारित डीपीआरमधील काही ठळक बाबी
- एकूण लांबी : ४५.२ किमी
- एकूण स्थानके : ३४ (पूर्वी ३१)
- अंदाजित खर्च : १२ हजार ९३७ कोटी रुपये
- दररोज ३.३२ लाख प्रवाशांची क्षमता
- मंजुरी मिळाल्यापासून ५ वर्षात प्रकल्प पूर्ण होईल
- भोसरी डिस्ट्रीक सेंटरच्या जागेत मेट्रोचा डेपो
- मेट्रो स्थानकांजवळ पार्किंग सुविधा प्रस्तावित
- चाकण औद्योगिक क्षेत्राला थेट जोडणार

