काही जाणाऱ्या अन् येणाऱ्या गाड्यांच्या स्थानकात बदल
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी (२ ऑगस्ट) मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी आणि अभियांत्रिकी कामांसाठी नऊ तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे या दिवशी पुणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून अनेक उपनगर आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे स्टेशनऐवजी खडकी, हडपसर आणि शिवाजीनगर स्थानकांवरून सुरू होतील किंवा तेथेच प्रवास समाप्त करतील.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत राहणार आहे. पुणे यार्डमधील ट्रॅकचे आधुनिकीकरण आणि देखभालीची महत्त्वाची कामे या काळात केली जाणार आहेत.
रेल्वे मार्गांचे आधुनिकीकरण
या विशेष ट्रॅफिक आणि वीज ब्लॉकदरम्यान डीडीएस पॉइंट क्रमांक २३२ (लाईन २ व ३) आणि पॉइंट क्रमांक २२६ (लाईन १ व २) बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील विद्यमान ५२ किलो रेल्वे रुळांच्या जागी अधिक मजबूत ६० किलो रुळांचे जाळे बसविण्यात येणार आहे.
याशिवाय सिग्नल आणि दूरसंचार तसेच ओव्हरहेड इक्विपमेंट यांची आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामेही केली जाणार आहेत. या कामांमुळे रेल्वे सेवेची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेत वाढ होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
ब्लॉकच्या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १, पुणे यार्डकडे जाणारी अप मेन लाईन तसेच लाईन क्रमांक १ ते ६ रेल्वे वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
या गाड्या रद्द
* पुणे-तळेगाव उपनगर
* तळेगाव-पुणे उपनगर
* पुणे-लोणावळा लोकल
* लोणावळा-शिवाजीनगर लोकल
* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)-पुणे एक्स्प्रेस
* पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) एक्स्प्रेस
* पुणे-दौंड डेमू
रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि धावण्याची सद्यस्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाचा किंवा एनटीईएस मोबाईल अॅपचा वापर करून अद्ययावत माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Pune : पोलीस काॅन्स्टेबल 'ड्रग्ज'मुळे डिसमिस, ड्रग्ज रॅकेटशी संबंध ठेवणे पडले महागात….
मध्य रेल्वेने या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली, तरी पुणे यार्डचे आधुनिकीकरण करण्यासाठी हा ब्लॉक अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या कामांमुळे रेल्वे मार्ग आणि सिग्नलिंग यंत्रणा अधिक सक्षम होईल, गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि भविष्यात रेल्वे सेवेची सुरक्षितता व कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.

