माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या टप्प्याला सुरक्षा आयुक्तांची तात्पुरती मंजुरी; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सेवेत दाखल होण्याची शक्यता
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
बहुप्रतीक्षित शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गिका क्रमांक ३ वर मेट्रोची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो कर्मचाऱ्यांसह दोन्ही शहरांतील नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि सुखकर होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२०३ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गावर एकूण २३ स्थानके उभारली जात आहेत. हा मार्ग हिंजवडीतील आयटी पार्कला थेट पुणे शहर आणि जिल्हा न्यायालयाशी जोडणार आहे. या प्रकल्पातील माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तात्पुरती मंजुरी मिळाली आहे.
सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने ५ ते ८ जुलैदरम्यान या मार्गावरील सिग्नल यंत्रणा, रूळ, विद्युत व्यवस्था, अग्निसुरक्षा, दूरसंचार आणि विविध तांत्रिक बाबींची सविस्तर पाहणी केली होती. त्यानंतर २३ जुलै रोजी प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक मंजुरी प्रदान करण्यात आली. नवीन 'सीबीटीसी' सिग्नल प्रणालीमुळे ही मेट्रो ताशी ८० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. हा संपूर्ण मार्ग ७५० व्होल्ट डीसी 'थर्ड रेल' प्रणालीवर कार्यरत असणार आहे.
या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असून, प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू आहेत. सर्व बाबी नियोजनानुसार पार पडल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
निगडी ते चाकण ४५ किलोमीटरच्या नव्या मार्गाचा प्रस्ताव
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड शहरातही मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते चाकण असा तब्बल ४५ किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग उभारला जाणार आहे. हा मार्ग भक्ती-शक्ती चौक, मुकाई चौक, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, लांडेवाडी, भोसरी मार्गे थेट चाकण असा असणार आहे. पुणे मेट्रोने या नव्या ४५ किलोमीटरच्या टप्प्यावर ३४ स्थानके प्रस्तावित केली आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वाकड आणि वल्लभनगर येथे अतिरिक्त दोन स्थानके वाढवण्याची मागणी केली आहे.
भोसरी उड्डाणपुलाबाबत लवकरच निर्णय
भोसरी येथील उड्डाणपूल न पाडता मेट्रोचे बांधकाम केले जावे, असा पर्याय पालिकेकडून सुचवण्यात आला आहे. उड्डाणपूल पाडल्यास लांडेवाडी-भोसरी मार्गे थेट चाकण असा मार्ग असेल; तर पूल न पाडल्यास गवळी माथा ते गोडाऊन चौक असा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत या अतिरिक्त स्थानकांचा आणि उड्डाणपुलाच्या पुनर्रचनेबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. या बैठकीनंतरच विस्तारित मार्गाच्या प्रत्यक्ष कामाची दिशा स्पष्ट होईल.

