नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई सुरू…
-जिगर हिंदोचा / प्रिन्स चौधरी
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून रोजी संपल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
एचएसआरपीसाठी नोंदणी न केलेल्या किंवा कोणतीही प्रक्रिया न सुरू केलेल्या वाहनचालकांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रानुसार, ३० जून २०२६ ही एचएसआरपी बसविण्याची अंतिम मुदत होती. १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांविरोधात केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन कायद्यातील कलम १७७ अंतर्गत कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहरात आतापर्यंत ९ लाख ४५ हजार ९३७ वाहनांवर एचएसआरपी बसविण्यात आली आहे. मात्र, राज्यभरात अद्याप एक कोटीहून अधिक वाहनांनी या नियमाचे पालन केलेले नाही. पुणे आरटीओने कारवाई सुरू करत एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनधारकांकडून एक हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सीविक मिरर आणि पुणे टाइम्स मिररशी बोलताना सांगितले, "ज्या वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत एचएसआरपीसाठी अर्ज केला नाही, अपॉइंटमेंट घेतली नाही किंवा अपॉइंटमेंट घेऊनही प्रक्रिया पूर्ण केली नाही, अशा वाहनांची आजपासून (१ जुलै) वाहतूक पोलीस चौकशी करतील. मात्र, ज्यांनी आधीच पुढील काही दिवसांसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही." भोसले म्हणाले, "एचएसआरपी बसविण्याचा खर्च सुमारे ५५० रुपये आहे, तर नियमभंग केल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागेल. हा दंड एकदाच आकारला जाणार नाही. एखादा वाहनधारक पुन्हा एचएसआरपीशिवाय आढळल्यास प्रत्येक वेळी त्याला पुन्हा एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल."
त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले, "दंड भरत राहण्यापेक्षा एचएसआरपी बसविणे अधिक फायद्याचे आहे. ही केवळ कायदेशीर सक्ती नसून वाहन सुरक्षेसाठीही महत्त्वाची बाब आहे." पुण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड म्हणाल्या, "ज्या वाहनधारकांनी एचएसआरपीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही, त्यांच्यावरच दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्वांनी शक्य तितक्या लवकर एचएसआरपी बसवून घ्यावी."
दरम्यान, एचएसआरपी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुणे टाइम्स मिररने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पुण्यात बनावट एचएसआरपी नंबर प्लेटची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.दंड टाळण्यासाठी वाहनधारकांची वाढलेली गर्दी पाहून नाना पेठसह शहरातील काही भागांमध्ये अनधिकृत विक्रेते बनावट एचएसआरपी नंबर प्लेट आणि बनावट होलोग्राम स्टिकर (कलर-कोडेड थर्ड लायसन्स प्लेट) तयार करून विकत असल्याचे आढळून आले.
एचएसआरपी मिळविण्याची अधिकृत प्रक्रिया केवळ ऑनलाइन
दुचाकींसाठी या बनावट प्लेट ३०० ते ५५० रुपये दरम्यान विकल्या जात असून, तातडीच्या कामासाठी अधिक पैसे आकारले जात आहेत. अधिकृत एचएसआरपीची किंमत मात्र ५३१ रुपये आहे.अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, एचएसआरपी मिळविण्याची अधिकृत प्रक्रिया केवळ ऑनलाइन आहे. वाहनधारकांनी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक अधिकृत एचएसआरपी संकेतस्थळावर किंवा परिवहन विभागाच्या पोर्टलवर नोंदविल्यानंतरच अधिकृत केंद्रातून नंबर प्लेट तयार करून बसविण्यात येते.
बनावट एचएसआरपी तयार करणारे आणि विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल."सरकारच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर छेडछाड न करता येणाऱ्या (टॅम्पर-प्रूफ) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले होते.अनेक वाहनधारकांनी अपॉइंटमेंट मिळण्यात झालेला विलंब, फिटमेंट केंद्रांची कमतरता आणि तांत्रिक अडचणी यामुळे प्रक्रिया रखडल्याचे कारण दिले असले, तरी यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
-स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
एचएसआरपीची आकडेवारी (एमएच-१२, पुणे)
एकूण अर्ज: ११,५५,३५१
३० जूनपर्यंत दिलेल्या अपॉइंटमेंट: ११,४८,१३५
३० जूनपर्यंत प्रत्यक्ष बसविण्यात आलेल्या एचएसआरपी: ९,४५,९३७

