Dailyhunt
Pune Rain | झाडपडीची झाडाझडती.! काँक्रिटीकरण घोटत आहे झाडांचा गळा; प्रशासनाची कबुली..

Pune Rain | झाडपडीची झाडाझडती.! काँक्रिटीकरण घोटत आहे झाडांचा गळा; प्रशासनाची कबुली..

पुणे : शहरात वेगाने होत असलेल्या काँक्रिटीकरणामुळे झाडांच्या अस्तित्वावर गंभीर संकट ओढवले असून याचे थेट परिणाम आता नागरिकांच्या सुरक्षेवरही होत आहेत. गुरुवारी (दि. २) एकाच दिवसात जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात तब्बल १०५ झाडे कोसळली.

यापैकी एका घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे पडण्याच्या घटनेसाठी काँक्रिटीकरणालाच जबाबदार धरले आहे.

शहरात झाडांभोवती झालेल्या काँक्रिटीकरणामुळे त्यांच्या मुळांना पूरक पाणी मिळत नाही. त्यामुळे झाडे उन्मळून पडत आहेत, अशी कबुली महापौर मंजूषा नागपुरे यांनीही दिली आहे. महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी, सुशोभीकरण आणि रस्तारुंदीकरण यांसारख्या प्रकल्पांवर भर दिला असला तरी यामुळे झाडांचा जीव जात आहे. या उपक्रमांमध्ये झाडांचे संरक्षण हा घटक दुय्यम ठरला असून शहरातील वृक्षांचे संवर्धन करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका पर्यावरणप्रेमी करत आहेत.

काॅंक्रिटीकरण घोटत आहे झाडांचा गळा : पुणे शहराच्या नागरी नियोजन आणि पर्यावरणीय संतुलनावर मोठे प्रश्नचिन्ह; काँक्रिटीकरणामुळे झाडांच्या मुळांना मिळत नाही पुरेसे ऑक्सिजन अन् पाणी

झाडांच्या मुळांना जिवंत राहण्यासाठी जमिनीतील हवेची आणि पाण्याची सतत गरज असते. पुणे शहरात रस्ते, फूटपाथ आणि सुशोभीकरण प्रकल्पांच्या नावाखाली झाडांच्या भोवती पूर्णपणे काँक्रीट टाकले आहे. यामुळे मातीतील हवेचा प्रवाह थांबतो आणि मुळे अक्षरशः श्वास घेऊ शकत नाहीत. त्यांच्या श्वास काँक्रिटीकरणात गुदमरला जात असल्याचे समोर आले आहे.

शहरात गुरुवारी (दि. २) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरात एकाच दिवशी तब्बल १०५ झाडे उन्मळून पडली. यापैकी एका घटनेत तर महिलेला जीव गमवावा लागला. यामुळे शहरातील नागरी नियोजन आणि पर्यावरणीय संतुलनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील वाढत्या काँक्रिटीकरणामुळे झाडांच्या मुळांवर होत असलेला परिणाम केवळ पर्यावरणीय हानीपुरता मर्यादित नसून, तो थेट शहराच्या अर्बन सेफ्टीला धक्का देणारा ठरत आहे.

"झाडांच्या वाढीसाठी मुळे जमिनीत खोलवर जाणे गरजेचे असते. पेव्हिंग ब्लॉक, क्राँकिटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण घटले आहे. यामुळे झाडे वरच्या वरच वाढतात. पर्णसंभार वाढलेल्या झाडांची अशास्त्रीय तोड केल्यामुळे झाड एका बाजुला झुकते. त्याची पकड सैल होते. मग वादळी पावसामुळे झाडे मुळापासून उन्मळून पडतात." - डॉ. विनय घाटे, वनस्पती तज्ज्ञ

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शुक्रवारी (दि. ३) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शहरातील झाडे पडण्याच्या घटनेला होणाऱ्या काँक्रिटीकरणालाच जबाबदार धरले आहे. शहरात झाडांभोवती होणाऱ्या काँक्रिटीकरणामुळे त्यांच्या मुळांना पूरक पाणी मिळत नाही. त्यामुळे झाडे उन्मळून पडत आहेत, अशी कबुली महापौर मंजूषा नागपुरे यांनीही दिली आहे.

म्हणून बाहेरून हिरवे दिसणारे झाड आतून असते मृत्यूच्या वाटेवर

यासंदर्भात 'सीविक मिरर'ने काही पर्यावरणतज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, काँक्रिटीकरणामुळे झाडांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, 'सॉइल ॲनॉक्सिया' (मातीतील ऑक्सिजनची कमतरता) ही गंभीर स्थिती निर्माण होत आहे. झाडांच्या मुळांना जिवंत राहण्यासाठी जमिनीतील हवेची आणि पाण्याची सतत गरज असते. मात्र, शहरात रस्ते, फूटपाथ आणि सुशोभीकरण प्रकल्पांच्या नावाखाली झाडांच्या भोवती पूर्णपणे काँक्रीट टाकले जाते.

"रस्ते आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांच्या मुळांवर काँक्रिट ओतले जाते. पण, त्याचा दीर्घकालीन परिणाम काय होईल, याचा कोणताही विचार केला जात नाही. झाडांना जगण्यासाठी आवश्यक असलेली मोकळी माती, पाणी आणि हवा पूर्णपणे हिरावून घेतली जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणा झाडांची बिकट अवस्था पाहायला मिळत आहे. छाटणीच्या नावाखाली झाडांची तोडफोड केली जाते. परिणामी त्यांचा समतोल बिघडतो आणि हेच कारण वृक्ष कोसळण्यास कारणीभूत ठरते." - सना शेख, पर्यावरणप्रेमी

यामुळे मातीतील हवेचा प्रवाह थांबतो आणि मुळे श्वास घेऊ शकत नाहीत. त्यांच्या श्वास काँक्रिटीकरणात गुदमरत आहे. याचा परिणाम म्हणून झाडांमध्ये रोग वाढतात, कीड लागते, पाने पिवळी पडून गळतात आणि झाडे आतून कमकुवत होऊ लागतात. बाहेरून हिरवे दिसणारे झाड प्रत्यक्षात आतून मृत्यूच्या वाटेवर असते. सध्या शहरात अनेक वर्षांच्या जुन्या झाडांवर हा परिणाम पाहायला मिळत आहे.

रस्ते गुळगुळीत करण्याच्या नावाखाली जुनी झाडे धोक्यात

काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही, ही मोठी गंभीर समस्या आहे. पावसाळ्यातही झाडांच्या मुळांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नाही. परिणामी, झाडांची पकड कमकुवत होते आणि ती सहज कोसळण्याची शक्यता वाढते. पुण्यातील बहुतांश रस्त्यांवर, नव्या बांधकामांमध्ये आणि सौंदर्यीकरण प्रकल्पांमध्ये हीच स्थिती पाहायला मिळते. कडुनिंब, पिंपळ, वड आणि रेन ट्रीसारखी दशकांपासून उभी असलेली भव्य झाडे केवळ रस्ते गुळगुळीत करण्याच्या नावाखाली धोक्यात आली आहेत.

'ट्री-गार्ड' की 'ट्री-किलर'?

शहरातील अनेक भागांमध्ये झाडांच्या भोवती उभारण्यात आलेले काँक्रीटचे चौकोनी संरक्षक (ट्री-गार्ड) प्रत्यक्षात झाडांसाठी 'ट्री-किलर' ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. झाडांच्या खोडाभोवती अगदी कमी जागा ठेवून उर्वरित भाग पूर्णपणे बंदिस्त केला जातो. यामुळे मुळांना ना हवा मिळते, ना पाणी. काही ठिकाणी तर झाडांच्या खोडालाच काँक्रीट चिकटवण्यात आले आहे. ही पद्धत झाडांच्या नैसर्गिक वाढीला पूर्णपणे अडथळा निर्माण करते.

११ वर्षांत कोसळली १२ हजारांवर झाडे

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०१४ ते २०२५ या कालावधीत पुण्यात १२,१५१ झाडे कोसळल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. ही संख्या केवळ पर्यावरणीय हानी दर्शवत नाही, तर तो थेट सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. विशेषतः २०२४ मध्ये झाडपडीच्या सर्वाधिक १,६८२ घटना नोंदवण्यात आल्या. त्यापूर्वी २०१९ मध्ये १,२६९ आणि २०१७ मध्ये १,२०१ घटना घडल्या होत्या. दर वर्षी वाढणारा हा आकडा शहरातील झाडांच्या असुरक्षिततेचे स्पष्ट चित्र उभे करतो.

…म्हणून लॉकडाउन झाडांसाठी ठरला होता चांगला

विशेष म्हणजे, २०२१ मध्ये झाड पडण्याच्या घटनांमध्ये घट दिसून आली होती. अधिकाऱ्यांच्या मते, कोविड-१९ लॉकडाउनदरम्यान बांधकामे थांबली होती. त्यामुळे झाडांच्या मुळांवर होणारा ताण कमी झाला. परिणामी झाडे तुलनेने सुरक्षित राहिली. यावरून स्पष्ट होते की, मानवनिर्मित हस्तक्षेप कमी झाला की झाडांचे आरोग्य सुधारते.

असंतुलित, अशास्त्रीय छाटणी हेही झाडपडीचे कारण

शहरात अलीकडे वाढलेल्या झाडपडीच्या घटनांमागे केवळ मुसळधार पाऊस आणि वादळीवारेच कारणीभूत नसून, असंतुलित आणि अशास्त्रीय छाटणी हेही एक गंभीर कारण समोर येत आहे. झाडांच्या फांद्या अयोग्य पद्धतीने कापल्यामुळे त्यांची नैसर्गिक रचना बिघडते आणि ती अधिक अस्थिर बनतात.

महापालिका आणि वीज वितरण कंपन्यांकडून झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम नियमितपणे केले जाते. मात्र, अनेकदा हे काम शास्त्रीय पद्धतीने न होता केवळ अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने केले जाते. परिणामी, झाडाचा नैसर्गिक समतोल बिघडतो. काही ठिकाणी झाडांच्या एका बाजूच्या फांद्या पूर्णपणे कापल्या जातात, तर दुसरी बाजू जड राहते. यामुळे झाडाचे वजन एकाच बाजूला झुकते आणि वाऱ्याच्या वेळी ते कोसळण्याचा धोका वाढतो.

झाडे कमकुवत होण्यामागे ही अनेक कारणे

तज्ज्ञांच्या मते, अयोग्य छाटणीमुळे झाडांच्या खोडावर आणि फांद्यांवर जखमा निर्माण होतात. या जखमांमधून बुरशी आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो. कालांतराने झाड आतून पोकळ होऊ लागते आणि त्याची संरचनात्मक ताकद कमी होते.याशिवाय, झाडाच्या वरच्या भागातील फांद्या अचानक काढल्यामुळे त्याच्या मुळांवर आणि खोडावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. त्यामुळे झाडाचा समतोल बिघडतो. शहरातील अनेक झाडे वयोमानानुसार आधीच कमकुवत झाली आहेत. काही झाडे पोकळ झाली आहेत, तर काहींना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा झाडांवर जर चुकीची छाटणी केली गेली, तर ती अधिक असुरक्षित बनतात.

'गर्डलिंग'मुळे झाडांवर मोठे संकट

शहरातील विकासकामांच्या नावाखाली झाडांवर होत असलेल्या अमानुष प्रकाराचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. बाणेर परिसरात एका झाडाच्या खोडाभोवती घट्ट बांधलेली लाल पट्टी दिसून येत असून, हा प्रकार 'गर्डलिंग' म्हणून ओळखला जातो. यामुळे झाडांच्या जीवनवाहिन्यांवर थेट परिणाम होत असून, त्यांचा जीव धोक्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, 'गर्डलिंग'मध्ये झाडाच्या सालेला किंवा खोडाभोवती घट्ट पट्टा बांधून त्याची संवहनी संस्था बाधित केली जाते. हीच प्रणाली मुळांपासून पाणी आणि पोषक द्रव्ये झाडाच्या वरच्या भागांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे हा पट्टा म्हणजे झाडाच्या गळ्याभोवती आवळलेली फासच ठरतो.

नियम आहेत, पण अंमलबजावणी कुठे?

महापालिकेच्या नियमांनुसार, झाडांच्या मुळांभोवती ठराविक अंतर मोकळे ठेवणे बंधनकारक आहे. तसेच बांधकाम करताना झाडांच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात हे नियम कागदावरच राहिले असल्याचे दिसून येते. रस्ते आणि फूटपाथ तयार करताना ठेकेदारांकडून सर्रासपणे झाडांच्या मुळांवर काँक्रीट ओतले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.

नियमित सर्वेक्षण करून तातडीने उपाय आवश्यक : विवेक वेलणकर

"रस्ते आणि फुटपाथच्या कामांदरम्यान झाडांच्या मुळांलगत होणारे काँक्रिटीकरण ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या भोवतीची मोकळी माती पूर्णपणे नाहीशी होते, त्यामुळे मुळांना हवा आणि पाणी मिळण्याचा मार्ग बंद होतो. झाडांना श्वास घेण्यासाठी आवश्यक जागाच उरत नाही. त्याचबरोबर झाडांची छाटणीही अनेकदा अशास्त्रीय पद्धतीने केली जाते. फांद्या कशाही कापल्यामुळे झाडांचा नैसर्गिक समतोल बिघडतो आणि ती वादळ वा पावसात सहज कोसळण्याच्या स्थितीत येतात. शहरातील अनेक झाडे जुनी आणि कमकुवत झालेली आहेत. त्यांचे नियमित सर्वेक्षण करून धोकादायक झाडांची वेळेत छाटणी किंवा आवश्यक असल्यास त्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धती अवलंबल्यास झाडपडीच्या घटना कमी करता येतील आणि नागरिकांची जीवितहानी टाळता येऊ शकते, असे
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror