जागतिकीकरणानंतर जग हे एक 'ग्लोबल व्हिलेज' झाले आहे. त्यामुळे जगात कुठेही एखादी समस्या निर्माण झाली, की त्याचा परिणाम काही अंशी का होईना, भारताच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येतो.
सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम महाराष्ट्राच्या विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनुभवायला मिळत आहे. जगाच्या एका कोपऱ्यात पेटलेल्या युद्धाच्या वणव्यामुळे भारतातील सामान्य, कष्टकरी माणसाला कसे होरपळून टाकत आहे, याची अनुभूती सध्या पुणे शहरात येत आहे.
सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रालाही बसत आहे. त्यातही पुण्यात याचे चटके सहज जाणवतात. पुण्यात आपले भविष्य घडवण्यासाठी राज्यासह देशभरातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना संकटामुळे फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील भू-राजकीय संघर्षाची किंमत आज पुण्यात स्पर्धा परीक्षा देणारा आणि खोली भाड्याने घेऊन राहणारा एक सामान्य विद्यार्थी मोजत आहे.
पुणे हे केवळ सिमेंट-कॉन्क्रीटचे शहर नाही, तर ते लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे शहर आहे. या आंतरराष्ट्रीय संकट काळात पुण्यात शिकणारा आणि उद्याचा भारत घडवणारा हा भावी पिढीचा पाठीचा कणा मोडणार नाही, याची काळजी समाज, प्रशासन आणि सरकार या तिघांनीही घेणे गरजेचे आहे. अन्यथा, युद्धाच्या आगीत दूर देशातील निरपराध लोकांसोबतच, आपल्या देशातील विद्यार्थ्यांची स्वप्नेही होरपळून खाक होतील, यात शंका नाही.
पुण्याची ओळख देशभरात विद्येचे माहेरघर आणि आधुनिक काळातील 'शिक्षणाचे हब' अशी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी या शहरात वास्तव्यास आहेत. सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ या शहरातील मध्यवर्ती भागांसह कोथरूड, कर्वेनगर, कात्रज, धनकवडी, वाघोली, सिंहगड रोड आणि हिंजवडी यांसारख्या परिसरांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कामानिमित्त राहणारे तरूण आहेत. या विद्यार्थ्यांना अतिशय मर्यादित बजेटमध्ये आपले खर्च भागवायचा असतो. मात्र, आखाती युद्धाने निर्माण केलेल्या जागतिक आर्थिक संकटामुळे त्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. घरून येणारी मोजकेच पैसे आणि शहरातील वाढती महागाई या दोन्हीं मेळ घालताना विद्यार्थ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे.
इंधन आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा
आखाती देशांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रमुख स्त्रोत आहेत. या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद असल्यामुळे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाला आहे. ज्याचा परिणाम भारतात इंधनाच्या दरांवर झाला आहे. दर वाढल्यामुळे भारतात इंधन आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांवर शहरातील मेस, खानावळी अवलंबून आहेत. यासाठी घरगुती गॅस वापरण्यास बंदी असल्याने व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरावा लागतो. या सिलिंडरच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे मेस चालकांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. याशिवाय, डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम भाजीपाला, धान्य, डाळी आणि किराणा साहित्याच्या दरांवर झाला आहे. अन्नधान्य महागल्यामुळे त्याचा अंतिम बोजा विद्यार्थ्यांच्या ताटावर पडत आहे. येथील विद्यार्थ्यांच्या आहाराचा मुख्य स्रोत म्हणजे 'मेस आणि खानावळी. पुण्याची मेस संस्कृती ही केवळ अन्न देणारी यंत्रणा नाही, तर ती विद्यार्थ्यांसाठी घर आणि आईची माया उणीव भरून काढणारी व्यवस्था आहे. मात्र, जागतिक संकटांमुळे या मेस चालकांना आता व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. याचे तीन प्रमुख परिणाम सध्या पुण्यात पाहायला मिळत आहेत:
गॅस, खाद्यतेल, भाज्या आणि किराणा साहित्याच्या वाढत्या दरांमुळे पुण्यातील अनेक लहान-मोठ्या मेस आणि पेठ भागातील घरगुती खानावळी आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अनेक चालकांनी "कमी दरात विद्यार्थ्यांना जेवण देणे आता परवडत नाही," अशी खंत व्यक्त करत व्यवसाय कायमचा बंद केला आहे. ज्या मेस अद्याप सुरू आहेत, त्यांनी वाढत्या खर्चामुळे मासिक शुल्कात ५०० ते १००० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. पूर्वी ३००० ते ३५०० रुपये असलेले शुल्क आता ४००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, दरवाढ करूनही खर्च भागवणे कठीण जात असल्याने काही मेस चालकांनी जेवणाचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी केली आहे. दूधजन्य पदार्थ, सॅलड आणि पौष्टिक भाज्यांचे प्रमाण घटवून केवळ पोट भरेल असे जेवण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
बजेट कोलमडल्याने विद्यार्थी मानसिक दबावात
पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी किंवा मध्यमवर्गीय कुटुंबांची आहे. दुष्काळ, अतिवृष्टी आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव अशा आर्थिक संकटांचा सामना करत पालक आपल्या मुलांना मोठ्या अपेक्षेने पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. घरून मिळणाऱ्या मर्यादित पैशात त्यांना खोलीचे भाडे, मेसचे शुल्क, पुस्तके, चहा-नाश्ता आणि इतर दैनंदिन खर्च भागवावे लागते. मात्र, मेसचे वाढलेले शुल्क, चहा-नाश्त्याचे वाढते दर आणि रूम भाड्यातील वाढ यामुळे त्यांचा मासिक खर्च २० ते ३० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पालक आधीच कर्जबाजारी आणि आर्थिक अडचणीत असल्याने त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी करणे विद्यार्थ्यांसाठी मानसिक तणावाचे कारण ठरत आहे. "आई-वडिलांनी कर्ज काढून शिक्षणासाठी पुण्यात पाठवले, आता त्यांच्याकडे आणखी पैसे कसे मागायचे?" या विचाराने अनेक विद्यार्थी मानसिक दबावाखाली जीवन जगत आहेत.
'एक वेळ जेवून' राहण्याची वेळ
पैशांची चणचण भासू लागल्यामुळे आणि घरातून अधिक पैसे मागता येत नसल्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांनी खर्च वाचवण्यासाठी अत्यंत धोकादायक आणि घातक मार्ग निवडले आहेत. अभ्यासाच्या वयात आणि शरीराला पोषणाची गरज असताना विद्यार्थी आपल्या पोटाला चिमटा काढत आहेत. अनेक विद्यार्थी सकाळी उशिरा उठतात, जेणेकरून सकाळच्या चहा-नाष्ट्याचा खर्च वाचेल आणि थेट दुपारचे जेवण करता येईल. काही विद्यार्थ्यांनी रात्रीची मेस बंद केली आहे. रात्रीच्या जेवणाऐवजी फक्त दूध-बिस्किट, पार्ले-जी किंवा केवळ पाणी पिऊन झोपणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पेठ भागात वाढली आहे.
पार्ट-टाइम नोकऱ्यांचा शोध आणि स्वप्नांचा बळी
वाढलेला मासिक खर्च भरून काढण्यासाठी आणि पुण्यात टिकून राहण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने शिक्षणाचा आणि अभ्यासाचा वेळ बाजूला ठेवून 'पार्ट-टाइम' नोकऱ्या शोधाव्या लागत आहेत. रात्रीच्या वेळी फूड डिलिव्हरी, हॉटेलमध्ये वेटरची कामे, सिक्युरिटी गार्ड किंवा कॉल सेंटरमध्ये काम करत आहेत. रात्रीच्या वेळी काम केल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि दिवसा लायब्ररीत अभ्यासाच्या वेळी त्यांना डुलक्या येतात. ज्या स्वप्नांसाठी, अधिकारी होण्यासाठी किंवा मोठ्या पदावर जाण्यासाठी ते आपले गाव सोडून पुण्यात आले होते, तो मूळ उद्देशच या जगण्याच्या लढाईत कुठेतरी मागे पडत चालला आहे. हा केवळ पैशांचा अपव्यय नाही, तर देशाच्या तरुण मनुष्यबळाचे होणारे मोठे नुकसान आहे.
युद्ध टीव्हीवर, चटके आमच्या ताटात
सदाशिव पेठेत गेल्या तीन वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, "आम्ही युद्ध टीव्हीवर बातम्यांमध्ये पाहतो, इस्रायल आणि आखाती देशात काय चालले आहे यावर लायब्ररीत चर्चा करतो. पण त्या युद्धाचे खरे चटके आज आमच्या ताटात बसत आहेत. मेसचे दर एकाएकी वाढलेत. घरी फोन करून पैसे मागण्याची हिंमत होत नाही, कारण वडिलांनी आधीच पीक वाया गेल्याचे सांगितले आहे. सध्या मी दिवसातून एकदाच मेसमध्ये जेवतो आणि रात्री रूमवर मॅगी किंवा पोहे करून खातो. असे दिवस काढत आम्ही किती दिवस अभ्यास करणार?"
प्रशासकीय, सामाजिक पातळीवर करता येणाऱ्या उपाययोजना
शासकीय सवलती आणि अनुदान
राज्य सरकारने आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने तातडीने यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद यांसारख्या शैक्षणिक केंद्रांमधील अधिकृत विद्यार्थी वसतिगृहे आणि त्यांच्याशी जोडलेल्या मेससाठी 'अनुदानित दराने' व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला पाहिजे. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक ओळखपत्रावर धान्य आणि तेल स्वस्त दरात देण्याची व्यवस्था करावी.
स्वयंसेवी संस्था आणि गणेश मंडळांचा पुढाकार
पुण्याला सामाजिक चळवळींचा आणि श्रीमंत गणेश मंडळांचा मोठा इतिहास आहे. पुण्यातील विविध सामाजिक संस्था, प्रसिद्ध गणेश मंडळे आणि ट्रस्ट यांनी पुढे येऊन गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कमी दरात उदा. १० किंवा २० रुपयांत किंवा मोफत 'कम्युनिटी किचन' किंवा अन्नछत्र सुरू करण्याची गरज आहे.
महाविद्यालये आणि विद्यापीठांचा पुढाकार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शहरातील नामांकित महाविद्यालयांनी उदा. फर्ग्युसन, सीओईपी, गरवारे आपल्या कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात 'नो प्रॉफिट नो लॉस' या तत्त्वावर सकस आहार उपलब्ध करून दिला पाहिजे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना 'कम अँड लर्न' योजनेच्या माध्यमातून अधिक संधी दिल्या पाहिजेत
'या' उपाययोजना तातडीने करण्याची गरज
शासकीय सवलती आणि अनुदान
स्वयंसेवी संस्था आणि गणेश मंडळांचा पुढाकार
महाविद्यालये आणि विद्यापीठांचा पुढाकार

