Dailyhunt
पुण्यात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी डल्ला मारत ६ लाखांचा ऐवज लंपास

पुण्यात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी डल्ला मारत ६ लाखांचा ऐवज लंपास

पुणे: शहरात घरफोडीच्या घटनांनी नागरिक हवालदिल झाले असून, चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे. केशवनगर-मुंढवा आणि वाघोली परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी एकूण ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पहिली घटना केशवनगर-मुंढवा भागात घडली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या चोरीत ५ लाख ८ हजार रुपयांच्या विविध गृहोपयोगी वस्तू चोरून नेण्यात आल्या आहेत. याप्रकरणी विशाल देवराम कोकतरे (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. २८ ते २९ एप्रिल दरम्यान चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ९० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिनेही लांबवले आहेत.

दुसरी घटना वाघोली जवळील आव्हाळवाडी येथे समोर आली आहे. चोरट्यांनी एका गोदामाच्या छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि १ लाख ३० हजार ९४३ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ज्ञानेश्वर तबाजी कांचन (वय ४१) यांनी वाघोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांच्या या 'मोडस ऑपरेंडी'मुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मुंढवा आणि लोणी कंद पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तांत्रिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror