Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; मुंबईला ठाण्यात 'रेड अलर्ट', अनेक रस्ते जलमय; पावसाचे आत्तापर्यंत पाच बळी

Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; मुंबईला ठाण्यात 'रेड अलर्ट', अनेक रस्ते जलमय; पावसाचे आत्तापर्यंत पाच बळी

मुंबई,ठाण्यासह महाराष्ट्रात मान्सूनचा Rain Update जोर वाढला असून पुढचे चार दिवस ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ७ तारखेपर्यंत राज्यात पावसाचे धुमशान सुरूच राहाणार आहे.

मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाने पुढच्या तीन दिवसांसाठी मुंबईसह ठाणे पालघर, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रात हवेचा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा या संपूर्ण आठवड्यात असाच सक्रिय राहणार असल्यामुळे समुद्राकडून येणारे पावसाचे ढग महाराष्ट्राकडे खेचले जात आहेत. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांत हे क्षेत्र अधिक मजबूत आणि सक्रिय होणार आहे. यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढून जास्त पाऊस पडत आहे.

हवेच्या खालच्या आणि वरच्या थरांमध्ये (साधारण २१डिग्री अक्षांशावर) विरुद्ध दिशेने वाहणारे वारे एकत्र आले आहेत, ज्याला 'शीअर झोन' म्हणतात. यामुळे ढगांची निर्मिती वेगाने होत असून पाऊस अधिक तीव्र झाला आहे.

कुठे किती पाऊस पडणार?
या हवामान बदलांमुळे संपूर्ण कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, सातारा, नाशिक परिसरात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर
मुसळधार पावसाची पार्श्वभूमी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, ठाण्यातल्या सगळ्या शाळांना सकाळ आणि दुपारी दोन्ही सत्रांत सुट्टी देण्यात आली होती. तर मुंबईत सकाळी वाढलेला पावसाचा जोर पाहून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शनिवारी दुपारच्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

पावसाचा मुंबईला तडाखा, अनेक मार्ग बंद
अतिमुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले होते. ज्यात अंधेरीमध्ये अंधेरी सब वे, वीरा देसाई मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग बंद झाले होते. चेंबूर येथील नूर ए इलाही सर्विस रोडवर पाणी साचले होते. विक्रोळीत हुमा मॉल जंक्शन आणि गांधीनगर जंक्शन, यासारख्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती.

मुंबईत कुठे किती पाऊस?

विक्रोळी : १६४ मिमी

राम मंदिर, जोगेश्वरी : १४८.५ मिमी

सांताक्रूझ : १२६.९ मिमी

विद्याविहार : १०२.० मिमी

वांद्रे : ७२.५ मिमी

शीव : ६३.५ मिमी

कुलाबा : ५३.४ मिमी

महापौराचा पाहाणी दौरा, नागरिकांना हटकले

मुंबई महानगरात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्याचवेळी, दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी समुद्राला भरती येणार होती यावेळी ४.२६ मीटर्सच्या लाटा उसळणार होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज दुपारी कोस्टलरोड परिसराची पाहाणी केली. यावेळी पावसाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या वरळी भागात समुद्र किनारी फिरत असलेल्या, जागोजागी कठड्यावर बसलेल्या नागरिकांना हटकत त्यांना निघून जायला महापौरांनी सांगितले. समुद्राच्या लाटा धडकत असताना किनाऱ्यावर जाण्याचा धोका पत्करणे योग्य नाही, असे महापौर म्हणाल्या.

मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पावसाचे राज्यात आत्तापर्यंत ५ बळी
पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत ३ , तर पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. ३० जूनला मुंबईत एक पिंपळाचे झाड स्कूल बसवर कोसळल्याने एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. २ जुलैला साकिनाका येथील खैराणी रोडवर ५५ वर्षीय व्यक्ती कंत्राटदारांनी नालेसफाईसाठी मॅनहोलचे झाकण उघडे ठेवल्याने त्यात पडून वाहून गेली. मीरा-भाईंदरमध्ये अंगावर झाड कोसळल्याने आणखी एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror