Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Rain Update : मान्सूनचा हाहाकार, देश संकटात! काश्मीरमध्ये ढगफुटी तर मुंबईत मुसळधार..

Rain Update : मान्सूनचा हाहाकार, देश संकटात! काश्मीरमध्ये ढगफुटी तर मुंबईत मुसळधार..

अनेक राज्यांमध्ये पूर आणि दरडी कोसळल्याने जनजीवन विस्कळीत, शाळांना सुट्टी, वायनाडमध्ये ५ कामगार गंभीर जखमी

नवी दिल्ली - देशभरात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, ढगफुटी आणि दरडी कोसळण्याच्या भीषण घटना घडल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्याच्या वरच्या भागात मंगळवारी (दि. ६) तीव्र ढगफुटी झाल्याने चिखल, पाणी आणि दगडांचा मोठा ढिगारा निवासी वस्त्यांमध्ये घुसला. या दुर्घटनेत रस्त्यांवर उभी असलेली अनेक वाहने गाडली गेली असून अनेक घरांचे व दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. किश्तवाडमध्येही पुरामुळे चिखल साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे, केरळमधील वायनाड येथे एका बोगद्याच्या प्रकल्पाच्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून ५ कामगार गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातही पावसाने रौद्ररूप धारण केले असून मुंबईत गेल्या ४८ तासांत सुमारे १५ इंच (३८० मिमी) पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि नाशिकमधील सर्व सरकारी व खासगी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरही दरड कोसळल्याची घटना घडली, मात्र जेसीबीच्या मदतीने मोठे दगड तातडीने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी देवीचे मंदिर आज भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

Russia-Ukraine war : रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला, राजधानी कीव्हवरील हल्ल्यात २२ नागरिकांचा मृत्यू…

Make Civic Mirror My Trusted Source

ठाणे जिल्हा प्रशासनाची पर्यटनाला बंदी

ठाणे जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशांपर्यंत पर्यटकांना गड-किल्ले, धबधबे आणि धरणांच्या ठिकाणी जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला असून वसई-विरार, नालासोपारा भागात रस्ते जलमय झाले आहेत. रेल्वे प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचताना मोठ्या अडचणी येत आहेत. रत्नागिरीतील शेलारवाडी येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एका घराचा भाग दबला गेला. ढिगाऱ्यातून एका महिलेची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, आणखी दोघे जण अडकल्याची भीती असल्याने स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

मध्य प्रदेशमध्ये ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मध्य प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असून गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांतील मशिन्स व क्रेन नद्यांमध्ये वाहून गेल्या आहेत, तसेच ४० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजस्थानमधील ७ जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' असून जयपूर, जोधपूरसह अनेक शहरांतील महामार्ग पाण्याखाली गेले आहेत. गुजरातच्या सुरत आणि जुनागढमध्ये रस्ते आणि शेती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत 'रेड' आणि 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

इतर राज्यांमध्येही पुराचा धोका

उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून सहारनपूरमधील शाकंभरी नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने मंदिर परिसर रिकामा करण्यात आला आहे. पिलीभीतमध्ये एका तलावाची पातळी वाढल्याने मगर मानवी वस्तीत घुसल्याची घटना समोर आली आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांतील तूट भरून काढत मान्सून सक्रिय झाला असून पुढील ७ दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror