Dailyhunt
Ratnagiri | जयगड समुद्रात मध्यरात्री 'हाय-स्पीड चेस'! अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौका जप्त; थरारक कारवाई.

Ratnagiri | जयगड समुद्रात मध्यरात्री 'हाय-स्पीड चेस'! अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौका जप्त; थरारक कारवाई.

त्नागिरी : जयगड समुद्रात मध्यरात्री राबवण्यात आलेल्या धाडसी मोहिमेत मत्स्य व्यवसाय विभागाने अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मोठी कारवाई करत त्यांना जप्त केले. या थरारक कारवाईमुळे संपूर्ण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे.

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर रत्नागिरीच्या समुद्रात या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून एलईडी लाईटचा वापर करून रात्रीच्या अंधारात बेकायदा मासेमारी सुरू असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. गस्ती नौकेसाठी डिझेल नसल्याची चर्चा पसरवून मासेमारांना निष्काळजी करण्यात आले होते. मात्र सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तपणे रणनीती आखत अचानक डिझेलची व्यवस्था करण्यात आली आणि कोणतीही चाहूल लागू न देता गस्ती नौका जयगडकडे रवाना करण्यात आली.

मध्यरात्रीच्या सुमारास प्रतिकूल हवामान, गडद अंधार आणि जोरदार वाऱ्याला न जुमानता पथकाने समुद्रात धडक दिली. चिन्मय जोशी, पार्थ तावडे, स्वप्नील चव्हाण, दीप्ती साळवी, स्मितल कांबळे तसेच तुषार कर्गुटकर, विनायक शिंदे, सुजन पवार आणि साईनाथ साळवी यांच्या पथकाने अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांना वेढा घातला. यावेळी एका नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र पथकाने तब्बल एक तास समुद्रात 'हाय-स्पीड चेस' करत त्या नौकेचा पाठलाग करून तिला अखेर जेरबंद केले. या कारवाईत इम्तियाज हाजी हसनमिया मुकादम यांची 'एच इम्तियाझ (इडिया एम-४ एमएम १९६१), 'लिना लक्ष्मण बिर्जे यांची लक्ष्मी (इंडिया-एमएच-४ एमएम ५०६) आणि 'अब्दुल लतीफ अली होडेकर यांची अक्सा इमरान' (इंडिया-एमएच-४ एमएम १९७१) या तीन नौका जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (एमएमएफआरए) अंतर्गत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अहवाल सहाय्यक आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror