Pune : सण-उत्सवाच्या काळात खासगी बस कंपन्यांकडून कशा प्रकारे प्रवाशांची लूट केली जाते आणि त्यांच्या सुरक्षिततेशी कसा खेळ केला जातो, याचा संतापजनक अनुभव एका प्रवाशाला आला आहे. 'रेडबस' (RedBus) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून 'पोलो महाराजा ट्रॅव्हल्स' (Polo Maharaja Travels) या बसची बुकिंग करणाऱ्या एका प्रवाशाचा प्रवास अत्यंत दयनीय आणि मानसोपचाराला ताण देणारा ठरला आहे.
या प्रवासात खराब बस, अस्वच्छता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बस चालवत असताना चालकाचे मोबाईलवर सुरू असलेले संभाषण, यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशाने बुकिंग करताना चांगल्या दर्जाची ') बस दाखवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात प्रवासाच्या वेळी पूर्णपणे वेगळी आणि अतिशय निकृष्ट दर्जाची बस आली. राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त वाढलेल्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी बस कंपनीने कोणतीही मूलभूत मानके पाळत नसलेली आणि डबघाईस आलेली अतिरिक्त बस प्रवाशांच्या माथी मारल्याचे स्पष्ट झाले.
बसमध्ये पाऊल ठेवताच संपूर्ण डब्यातून अत्यंत दुर्गंधी सुटली होती. विशेष म्हणजे, बसच्या एसी व्हेंट्समधून सतत पाणी गळत असल्यामुळे प्रवाशांच्या संपूर्ण सीट ओल्या झाल्या होत्या. केवळ एकाच प्रवाशाची नव्हे, तर बसमधील इतर अनेक प्रवाशांनाही याच समस्येचा सामना करावा लागला. इतकेच नव्हे तर, बसमधील उशा आणि चादरी अत्यंत मळकट आणि घाणेरड्या होत्या, तर फर्निचरची अवस्था अत्यंत बिकट होती.
या संपूर्ण प्रवासातील सर्वात वाईट अनुभव म्हणजे बसचालक आणि मदतनीसाचे (क्लिनर) अत्यंत उद्धट आणि मुजोरीचे वर्तन ठरले. संबंधित प्रवासी आपल्या पत्नी आणि चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीसह प्रवास करत होते. बसमधील दयनीय परिस्थिती पाहता, त्यांनी चालकाला आम्हाला परत सोडा, जेणे करून आम्ही दुसरी बस करू शकू, अशी विनंती केली. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याऐवजी चालकाने अत्यंत अरेरावीची भाषा वापरत, "आप इधर ही उतर जाओ, हम आपको रिक्शा भाड़ा दे देंगे," अशी धमकीवजा मग्रुरी दाखवली. विशेष म्हणजे, मध्यरात्रीची वेळ असताना आणि सोबत लहान मूल असताना चालकाने दाखवलेल्या या अमानुष वर्तनामुळे प्रवाशाची मोठी हेळसांड झाली.
एका बाजूला बसची ही दयनीय अवस्था आणि चालकाची मुजोरी असताना, दुसरीकडे बस चालवत असताना चालक सतत मोबाईलवर फोनवर गप्पा मारत असल्याचे समोर आले. प्रवाशांच्या जीवाचा अशा प्रकारे विनाकारण पत्ता पणाला लावणार्या या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्राहक पैसे देऊनही मूलभूत स्वच्छता, सुरक्षितता आणि व्यावसायिक सेवा मिळवण्यापासून वंचित राहत असून, 'रेडबस' आणि 'पोलो महाराजा ट्रॅव्हल्स'च्या या मनमानी कारभारावर कठोर कारवाईची मागणी संतप्त प्रवाशांकडून होत आहे.

