Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'रेडियंट' प्रकरणात जाणिवपूर्वक दिरंगाई

'रेडियंट' प्रकरणात जाणिवपूर्वक दिरंगाई

राडी पोलीस ठाण्याकडून तपासाला चालढकल; नोकरीच्या इच्छुकांची पोलिसांकडून जलद कारवाईची मागणी

नोकरीच्या इच्छुकांच्या एका गटाने रेडियंट आयटी कन्सल्टन्सी आणि संबंधित काही तंत्रज्ञान कंपन्यांकडून कथित आर्थिक फसवणूक, वेतन थकवणे तसेच संशयास्पद भरती प्रक्रियेप्रकरणी तपासाला गती देण्याची मागणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

नोकरीच्या इच्छुकांनी २७ ऑगस्ट रोजी अमितेश कुमार यांची भेट घेतली. खराडी पोलीस ठाण्याकडून तपासाला गती दिली जात नसून तपासाबाबत आवश्यक माहितीही दिली जात नसल्याची तक्रार त्यांनी केली.

यानंतर कुमार यांनी खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना फोन करून नोकरीच्या इच्छुकांचे जबाब नोंदवून घेण्याचे तसेच त्यांना तपासाबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले. 'सीविक मिरर' आणि 'पुणे टाइम्स मिरर'कडे उपलब्ध असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये कुमार हे चव्हाण यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येते. शनिवारी प्रसिद्धीच्या वेळेपर्यंत चव्हाण आणि रवींद्र गोडसे यांनी अनेक फोन आणि संदेश करूनही प्रतिसाद दिला नाही.

'सीविक मिरर' आणि 'पुणे टाइम्स मिरर'कडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आलेल्या अर्जाची प्रत आहे. या अर्जानुसार, यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारीनंतर रेडियंट आयटी कन्सल्टन्सीचे संचालक सैफ मनियार यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्यांना अटक झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणाशी संबंधित अन्य कंपन्यांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, रेडियंट आयटी कन्सल्टन्सीने विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आणि त्यांना कार्व्हानम इंडिया, स्टोइक अँड सॅलॅमॅंडर, सायब्रोमॅटिक, जीटॅस्ट्रिक्स, अॅक्युअर सॉफ्टटेक, लीन क्वालिटी आयटी सर्व्हिसेस आणि व्हाइटटेबल टेक्नॉलॉजी या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी पाठविले. या कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी काम केले. मात्र, त्यांना चार ते सात महिन्यांपर्यंत वेतन मिळाले नसल्याचा आरोप आहे. काही विद्यार्थ्यांना थकित वेतन न देता कामावरून कमी करण्यात आले किंवा निलंबित करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.तक्रारदारांनी जबाब, बँक व्यवहारांचे रेकॉर्ड, ई-मेल, संदेश आणि अन्य पुरावे पोलिसांकडे सादर केल्याचे सांगितले. मात्र, संबंधित कंपन्यांचे मालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

खराडी पोलीस ठाण्याकडून योग्य प्रतिसाद नसल्याचा आरोप
या निवेदनात तपास प्रक्रियेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार खराडी पोलीस ठाण्यात बोलावून अनेक तास प्रतीक्षा करायला लावली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.वारंवार पोलीस ठाण्यात जाऊनही तपासाची प्रगती काय आहे, याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका नोकरीच्या इच्छुकाने पुणे मिररला सांगितले की, गोडसे हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देत नाहीत. विद्यार्थ्यांना बराच वेळ प्रतीक्षा करायला लावली जाते आणि तपासाबाबत योग्य माहिती दिली जात नाही. शनिवारी काही विद्यार्थी खराडी पोलीस ठाण्यात गेले असतानाही त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्याने केला.

स्वतंत्र तपासाची मागणी
खराडीतील सिटी व्हिस्टा येथील एम माइंड टेक्नॉलॉजीविरोधातही स्वतंत्र आरोप करण्यात आला आहे. या कंपनीशी संबंधित प्रकरणात जवळपास ८० विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.काही बाधित विद्यार्थ्यांनी निवेदन सादर करण्याच्या सुमारे महिनाभर आधी खराडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.रेडियंट आयटी कन्सल्टन्सीशी संबंधित असल्याचे कथितरीत्या सांगितल्या जाणाऱ्या सर्व कंपन्यांच्या भूमिकेचा सखोल तपास करावा, अशी मागणी नोकरीच्या इच्छुकांनी केली आहे. पुराव्यांवरून गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित कंपन्यांचे मालक आणि अन्य जबाबदार व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

एम माइंड टेक्नॉलॉजीविरोधातील आरोपांची स्वतंत्र चौकशी करावी तसेच दोन्ही प्रकरणांतील तपासाला गती देण्याचे निर्देश तपासी अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. थकीत वेतन आणि अन्य रक्कम विद्यार्थ्यांना कधीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे, याबाबत पोलिसांनी स्पष्टता द्यावी, असेही त्यात म्हटले आहे.नोकरीच्या इच्छुकांसोबत गेलेले सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप युवा मोर्चाचे सदस्य ओंकार तुपे म्हणाले, "अनेक विद्यार्थ्यांचे करिअर आणि आर्थिक सुरक्षितता पणाला लागली आहे. या प्रकरणावर पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष ठेवावे, अशी मागणी मी केली आहे."

तुपे पुढे म्हणाले, "पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पुण्यात अन्यत्रही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्यास भाजप युवा मोर्चा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. दोषी व्यक्ती कोणत्याही पदावर असली तरी तिला सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील."

भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक म्हणाले, "विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्यांना सोडले जाणार नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror