Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संपादकीय : आता लक्ष पंजाबवर

संपादकीय : आता लक्ष पंजाबवर

भारतीय राजकारणात सध्या प्रादेशिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष आणि नव्या चेहऱ्यांच्या उदयामुळे मोठी उलथापालथ सुरू आहे. तमिळनाडूमधील अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाची वाढ, काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि पंजाबमध्ये भाजपची नव्याने सुरू झालेली मोहीम या सगळ्या घटना वरकरणी वेगळ्या वाटल्या तरी त्या भारतीय राजकारणातील संक्रमणाचीच चिन्हे आहेत.

तमिळनाडूमध्ये काँग्रेसने विजय यांच्या टीव्हीकेसोबत जवळीक वाढवण्याचा निर्णय घेतला, तो तत्कालीन राजकीय गरज समजला गेला. सहा दशकांपासून राज्य सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला पुन्हा सत्तेच्या रचनेत स्थान मिळवण्यासाठी लोकप्रिय चेहरा हवा होता. विजय यांची प्रचंड चाहतावर्गावर पकड आणि तरुणांमधील लोकप्रियता पाहता काँग्रेसमधील एका गटाला यात संधी दिसली. मात्र, कोणत्याही प्रादेशिक नेत्याची महत्त्वाकांक्षा केवळ एका राज्यापुरती मर्यादित राहत नाही, हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे.

केरळमध्ये विजय यांनी शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहत थेट त्रिशूरमध्ये टीव्हीकेच्या विस्तार मोहिमेला सुरुवात केली, तेव्हा काँग्रेसच्या एका गटाला वास्तवाची जाणीव झाली. ज्याला आपण सहकारी समजत होतो, तो उद्याचा प्रतिस्पर्धी ठरू शकतो, ही भीती आता काँग्रेसमध्ये स्पष्ट दिसू लागली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेसचा पाया खिळखिळा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे उदाहरण अजून ताजे आहे. विजय यांच्याबाबतही अशीच शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय राजकारणातील एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांची गरज असते, पण त्याच वेळी त्यांची भीतीही वाटते. भाजपने अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व कमी करत स्वतःची जागा निर्माण केली. आता तमिळनाडूसारख्या राज्यांत द्रविड पक्षांची पकड कमकुवत करण्यासाठी नव्या राजकीय समीकरणांना खतपाणी घातले जात असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. विजय यांचा उदय हा केवळ एका अभिनेत्याचा राजकारणात प्रवेश नसून दक्षिण भारतीय राजकारणाच्या पुनर्रचनेची सुरुवात ठरू शकतो.

काँग्रेसमधील केरळ नेतृत्व निवडीभोवतीचा तणावही पक्षाच्या अंतर्गत स्थितीचे दर्शन घडवतो. तेथे मुख्यमंत्रिपदासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या केसी वेणुगोपाल यांचे नाव पुढे केले जात होते. दिल्लीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर राजकीय गुंतवणूक केली होती. मात्र, अखेर व्हीडी सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड झाली. दुसरीकडे भाजपने आता पश्चिम बंगालनंतर पंजाबवर लक्ष केंद्रित केले आहे. पंजाबमध्ये भाजपला आजवर फारसे यश मिळाले नाही. मात्र, राघव चढ्ढा, हरभजनसिंग यांच्यासह आम आदमी पक्षातील अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात करून भाजपने दीर्घकालीन रणनीती आखल्याचे दिसते. हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्यावर पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. यातून जातीय आणि सामाजिक समीकरणांचा विचार स्पष्ट दिसतो.

अरविंद केजरीवाल दिल्लीतील पराभवानंतर पंजाबमध्ये अधिक सक्रिय झाले आहेत. पंजाब हा आता केवळ राज्याचा प्रश्न राहिलेला नाही, तर राष्ट्रीय राजकारणातील पुढील मोठे रणांगण बनत आहे. भाजप, आप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी पंजाबचे राजकारण भविष्यातील दिशा ठरवणारे ठरू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror