Smita Patil Life Secrets : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या अकाली निधनाला अनेक वर्षे उलटूनही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे खुलासे आजही चाहत्यांना थक्क करतात.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्मिता यांच्या जवळच्या मैत्रीण आणि चित्रपट निर्मात्या अरुणा राजे यांनी स्मिता यांच्या निधनाच्या त्या रात्री जसलोक हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं होतं आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील संघर्षाबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी बाळंतपणानंतर काही आठवड्यांतच स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. २८ नोव्हेंबर रोजी त्यांनी प्रतीक बब्बरला जन्म दिला होता, परंतु त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली.
अरुणा राजे यांनी सांगितले की, स्मिता यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच त्या तातडीने रुग्णालयात पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी स्मिता यांना ज्या अवस्थेत पाहिले, ते शब्दात सांगणे कठीण आहे. स्मिता आपल्याला सोडून गेल्याचे त्यांच्या आईच्या आणि तिथल्या परिस्थितीवरून स्पष्ट झाले होते. स्मिता यांच्या आई पूर्णपणे खचल्या होत्या, पण तान्ह्या प्रतीकासाठी त्यांना स्वतःला सावरणे भाग होते.
स्मिता यांच्या निधनानंतर त्यांच्या आईने त्यांच्या काही खासगी नोटस् आणि पत्रे अरुणा राजे यांच्याकडे सोपवली होती. ही पत्रे वाचताना अरुणा यांना स्मिता यांच्या अशा एका बाजूची ओळख झाली, जी जगापासून पूर्णपणे लपलेली होती. स्मिता राज बब्बर यांच्या प्रेमात अक्षरशः वेड्या होत्या, हे त्या पत्रांमधून स्पष्टपणे जाणवत होते. सात महिन्यांची गरोदर असताना आणि डॉक्टरांनी सक्त मनाई केलेली असतानाही, केवळ राज बब्बर यांच्या प्रेमापोटी त्यांनी 'करवा चौथ'चे व्रत पाळले होते.
ज्या नात्यासाठी त्यांनी समाजाची आणि टीकेची पर्वा न करता संसार थाटला, त्याच नात्याने त्यांना आयुष्याच्या अखेरीस प्रचंड एकाकीपण दिलं होतं. राज बब्बर यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नसल्याने स्मिता यांना कधीच स्थैर्य लाभले नाही. या निर्णयामुळे त्यांचे अनेक मित्र आणि कुटुंबीय त्यांच्यापासून दुरावले गेले होते, ज्यामुळे त्या खूप एकट्या पडल्या होत्या. अरुणा राजे यांच्याशी बोलताना त्या आपल्या मनातील कडू आठवणी आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल नेहमी मनमोकळेपणाने व्यक्त होत असत. समाजाने ज्या नात्यावर टीका केली, त्याच नात्यात स्मिता यांनी शेवटपर्यंत आपले सर्वस्व अर्पण केले, पण त्याबदल्यात त्यांना मिळालेले एकाकीपण त्यांच्या पत्रांमधून अधोरेखित झाले आहे.

