मोरोक्कोतून स्पेनच्या हद्दीत घुसखोरीचा आफ्रिकन स्थलांतरितांचा प्रयत्न; १८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक सुरक्षा जवान जखमी
सेउटा : मोरोक्कोतून स्पेनच्या सेउटा या सीमावर्ती शहरात मोठ्या संख्येने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आफ्रिकन स्थलांतरितांमध्ये गुरुवारी (दि.३०) झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १८ जणांचा मृत्यू झाला.
या घटनेत स्पॅनिश आणि मोरोक्कोच्या सुरक्षा दलातील १०० हून अधिक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा युरोपमध्ये बेकायदा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माहितीनुसार, चांगल्या रोजगाराच्या आणि सुरक्षित आयुष्याच्या शोधात सुमारे तीन हजार स्थलांतरितांनी पहाटेच्या वेळी सेउटा सीमेकडे धाव घेतली. या वेळी सुरक्षा दलांची हालचाल तुलनेने कमी असेल, असा अंदाज बांधून त्यांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुंपणाजवळील अरुंद मार्ग, मोठी गर्दी आणि सुरक्षा दलांनी घातलेल्या वेढ्यामुळे एकच गोंधळ उडाला. अनेक जण एकमेकांवर पडल्याने चेंगराचेंगरी झाली. काहींचा गुदमरून मृत्यू झाला, तर अनेक जण समुद्रात बुडाल्याची माहिती आहे.
सेउटा हे शहर भौगोलिकदृष्ट्या आफ्रिका खंडात असले, तरी ते स्पेन आणि युरोपियन संघाचा भाग आहे. त्यामुळे या शहरात प्रवेश मिळाल्यास स्थलांतरितांना युरोपियन संघाच्या हद्दीत पोहोचल्याचे मानले जाते. याच कारणामुळे मोरोक्कोसह अनेक आफ्रिकन आणि आशियाई देशांतील हजारो लोक दरवर्षी या मार्गाने युरोपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात.
सेउटा आणि जवळील मेलिला ही स्पेनची उत्तर आफ्रिकेतील दोन स्वायत्त शहरे असून, आफ्रिका आणि युरोप यांच्यातील थेट भूसीमा येथे आहे. काही स्थलांतरित समुद्रातून पोहत सीमा ओलांडतात, काही लहान बोटींचा वापर करतात, तर अनेक जण उंच सीमाकुंपणावर चढून किंवा ते तोडून आत जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अत्याधुनिक सेन्सर्स, निगराणी मनोरे आणि स्पॅनिश सुरक्षा दलांमुळे त्यांचे प्रयत्न अनेकदा हाणून पाडले जातात.
घटनेनंतर स्पेन सरकारने सीमा सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, हवाई आणि नौदल गस्त वाढविण्यात आली आहे. समुद्रमार्गे होणारी घुसखोरी रोखण्यासाठी विशेष सागरी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. तसेच युरोपियन संघाने सीमा सुरक्षा संस्था 'फ्रोंटेक्स'मार्फत स्पेनला आवश्यक मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.
दरम्यान, सेउटा आणि मेलिला या शहरांवरून स्पेन आणि मोरोक्को यांच्यातील जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. मोरोक्कोचा दावा आहे की, ही दोन्ही शहरे आफ्रिका खंडातील असून त्यांचा ताबा मोरोक्कोकडे असायला हवा. मात्र, स्पेनने हा दावा फेटाळला असून सिउटा सुमारे ३५० वर्षांपासून स्पेनच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. स्थानिक नागरिकही स्वतःला स्पॅनिश मानत असल्याने ही शहरे स्पेनपासून वेगळी करण्यास विरोध करतात. त्यामुळे सीमावाद आणि बेकायदा स्थलांतराचा प्रश्न आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
US Iran War | अमेरिकेकडून इराणमध्ये आगडोंब, आयआरजीसीच्या तळांसह १० हून अधिक शहरांवर हवाई हल्ले…
स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिलेल्या एका निर्णयानुसार, समुद्रातून येणाऱ्या स्थलांतरितांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय लगेच परत पाठवण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळेच स्थलांतरितांचे धाडस वाढल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. मात्र, मोरक्कन अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकारावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या दोन्ही स्पॅनिश शहरांमधील निवारा केंद्रे पूर्णपणे भरली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या संकटाकडे लक्ष वेधले जात आहे.
मेलिला शहरामध्येही चकमकी
सेउटातील तणावाचे सावट स्पेनचा उत्तर आफ्रिकेतील दुसरा भाग असलेल्या मेलिला शहरावरही पडले. मेलिला सीमेवरील 'ब्नी नसार' या मोरक्कन शहरात शेकडो स्थलांतरितांनी ६ मीटर उंच कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांच्या गाड्या पेटवून देण्यात आल्या. मोरक्कन पोलिसांनी कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. मोरक्कोच्या नागरिकांनुसार, आपल्या देशातील बेरोजगारी आणि गरिबीला कंटाळून ते युरोपमध्ये चांगल्या भविष्याच्या आशेने हा धोका पत्करत आहेत. तर दुसरीकडे, अनेक मोरक्कन नागरिक सेउटा आणि मेलिला या दोन्ही स्पॅनिश शहरांना मोरक्कोचाच व्यापलेला भाग मानतात.
सीमा संरक्षणासाठी सैन्याची तैनातीची मागणी
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ आणि गृहमंत्री फर्नांडो ग्रांडे-मार्लास्का सेउटाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सेउटाच्या स्थानिक सरकारने माद्रिद (स्पेन सरकार) कडे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची आणि सीमेच्या संरक्षणासाठी सैन्याची तैनाती करण्याची तातडीची मागणी केली आहे. दुसरीकडे, या घुसखोरीच्या घटनेनंतर फ्रांसनेही सतर्कता बाळगत स्पेनसोबतच्या आपल्या सीमांवर 'रॅपिड इंटरव्हेंशन बॉर्डर फोर्स' तैनात करून तपासणी कडक केली आहे.

