तेहरान : पश्चिम आशियातील युद्धसंघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत असतानाच, इराणने आता अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. "आम्हाला युद्ध नको आहे, पण भविष्यात आमच्यावर पुन्हा हल्ले होणार नाहीत, याची ठोस लेखी गॅरंटी द्या," अशा स्पष्ट शब्दांत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांना ठणकावून सांगितले आहे.
मंगळवारी (दि.३१) युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पेझेश्कियान यांनी आपली भूमिका मांडली. "परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्वात पहिले पाऊल म्हणजे तातडीने सुरू असलेले सर्व हल्ले थांबवणे. जोपर्यंत गोळीबार थांबत नाही, तोपर्यंत कोणतीही शांतता चर्चा यशस्वी होऊ शकत नाही," असे त्यांनी निक्षून सांगितले. इराणने कधीही स्वतःहून तणाव वाढवलेला नाही, मात्र देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेजारील देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर होणाऱ्या हल्ल्यांचे समर्थन करताना पेझेश्कियान म्हणाले की, इराण शेजारील देशांच्या सीमांचा आदर करतो. मात्र, ज्या देशांनी आपल्या जमिनीचा वापर इराणविरुद्ध हल्ले करण्यासाठी अमेरिकेला करू दिला, त्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा परिस्थितीत स्वसंरक्षणासाठी अमेरिकन तळांना लक्ष्य करणे ही इराणची मजबुरी बनली आहे.
युरोपियन युनियनवर सडकून टीका…
पेझेश्कियान यांनी यावेळी युरोपियन युनियनच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. इराणवर होणाऱ्या लष्करी कारवायांची युरोपने उघडपणे निंदा केली नाही, हे खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले. केवळ स्वतःच्या सोयीचे राजकारण न करता आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर भूमिका घेण्याचा सल्ला त्यांनी युरोपला दिला. दरम्यान, कोस्टा यांनी इराणला आश्वासन दिले की, युरोपियन युनियन कोणत्याही आक्रमक कारवाईच्या समर्थनात नाही आणि प्रादेशिक तणाव कमी करणे ही काळाची गरज आहे.

