Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
World Lung Cancer Day 2026 : वाढत्या वयात फुफ्फुसांना हानीकारक सवयी टाळा

World Lung Cancer Day 2026 : वाढत्या वयात फुफ्फुसांना हानीकारक सवयी टाळा

जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन विशेष; फुफ्फुसांनाही वाढते वय; दैनंदिन सात सवयी ठरू शकतात घातक

तनिषा ज. कुंदेन

१ ऑगस्ट हा जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पुण्यातील फुफ्फुसरोगतज्ज्ञ आणि कर्करोगतज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच नव्हे, तर धूम्रपान न करणाऱ्यांनाही दैनंदिन जीवनातील काही सवयींमुळे फुफ्फुसांचे अकाली वृद्धत्व, दीर्घकालीन श्वसनविकार आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्रवासादरम्यान प्रदूषित हवेचा सतत होणारा संपर्क, घरातील अपुरी हवा खेळती राहणे, निष्क्रिय जीवनशैली आणि असंतुलित आहार यांसारख्या सवयींचा परिणाम तात्काळ जाणवत नाही. मात्र, वर्षानुवर्षे होणाऱ्या या परिणामांमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते.

वायू प्रदूषण सर्वात मोठा धोका

पल्मोनरी मेडिसिन विभागाचे सहयोगी संचालक डॉ. आनंद विजय म्हणाले, "फुफ्फुसांचे नुकसान केवळ धूम्रपानामुळे होते, ही समजूत चुकीची आहे. सूक्ष्म धूलिकणांनी (PM) भरलेल्या प्रदूषित हवेचा दीर्घकाळ संपर्क आल्याने फुफ्फुसांमध्ये दाह निर्माण होतो आणि त्यांचे वृद्धत्व वेगाने होते. त्यामुळे दमा, सीओपीडी आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो."

त्यांच्या मते, भारतातील वाढते वायू प्रदूषण हे दीर्घकालीन श्वसनविकारांचे प्रमुख कारण बनत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.

घरातील प्रदूषणही तितकेच धोकादायक

डॉ. विजय यांनी सांगितले की, दुय्यम धूम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंग), एअर फ्रेशनर, एरोसोल स्प्रे, डास अगरबत्ती, उदबत्ती तसेच धूर साचणारी स्वयंपाकघरे यांमधील प्रदूषक घटकही फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरतात. अपुरी हवा खेळती राहणाऱ्या घरांमध्ये दीर्घकाळ राहिल्यास श्वसनसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

बैठी जीवनशैली फुफ्फुसांची क्षमता कमी करते
छातीरोगतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी यांनी सांगितले की, नियमित व्यायामामुळे श्वसनाचे स्नायू मजबूत राहतात आणि फुफ्फुसांची क्षमता टिकून राहते. उलट, बैठी जीवनशैलीमुळे श्वसनक्षमता हळूहळू कमी होत जाते.

त्यांच्या मते, फळे, भाज्या, सुकामेवा आणि संपूर्ण धान्यांमधील अँटिऑक्सिडंट्स फुफ्फुसांचे संरक्षण करतात. तर प्रक्रिया केलेल्या अन्नाचे (प्रोसेस्ड फूड) अतिसेवन शरीराची नुकसान भरून काढण्याची क्षमता कमी करते.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

अनेक जण सततचा खोकला किंवा श्वास लागणे ही किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र, अनेक आठवडे खोकला राहणे, वारंवार छातीचे संसर्ग होणे, घरघर, छातीत वेदना किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉ. मोदी यांनी दिला.

बांधकाम, रसायने, धूळ किंवा औद्योगिक धूर यांच्या संपर्कात काम करणाऱ्यांनी संरक्षक मास्कचा नियमित वापर करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

फुफ्फुसाचा कर्करोग आता धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही

कर्करोगतज्ज्ञ डॉ. रेश्मा पुराणिक यांनी सांगितले की, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे स्वरूप बदलत आहे. धूम्रपान हे अद्याप प्रमुख कारण असले तरी वायू प्रदूषण, दुय्यम धूम्रपान, घरातील प्रदूषण आणि व्यावसायिक कारणांमुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही फुफ्फुसाचा कर्करोग वाढताना दिसत आहे.

त्यांच्या मते, या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे स्पष्ट नसल्यामुळे अनेक रुग्ण उशिरा उपचारासाठी येतात. त्यामुळे श्वसनाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

छोट्या सवयींनी फुफ्फुसांचे संरक्षण शक्य

तज्ज्ञांच्या मते, घरात पुरेशी हवा खेळती ठेवणे, धूम्रपानापासून दूर राहणे, नियमित व्यायाम करणे, पुरेसे पाणी पिणे, ताज्या फळभाज्यांचा आहार घेणे आणि वायू प्रदूषण जास्त असताना चांगल्या दर्जाचा मास्क वापरणे या सवयी फुफ्फुसांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले ठेवण्यास मदत करतात.

फुफ्फुसांना हानी पोहोचवणाऱ्या ७ सवयी

वायू प्रदूषणाच्या सतत संपर्कात राहणे.
घरातील अपुरी हवा खेळती राहणे.
दुय्यम धूम्रपान व घरातील धूर.
बैठी जीवनशैली.
प्रक्रिया केलेल्या अन्नाचे अतिसेवन.
धूळ, रसायने व औद्योगिक धुरापासून संरक्षण न करणे.
श्वसनाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करणे.

World Hepatitis Day 2026 : लक्षणे सारखी, आजार वेगळे…

ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका.

अनेक आठवडे कायम राहणारा खोकला.
श्वास घेण्यास त्रास.
श्वास घेताना घरघर.
छातीत वेदना किंवा अस्वस्थता.
वारंवार छातीचे संसर्ग.
खोकल्यातून रक्त येणे.
कारण नसताना वजन कमी होणे.
आवाज दीर्घकाळ बसणे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror