रणबीर कपूरचा 'रामायण' हा चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, 'रामायण' सिनेमाचा रनटाइम किती असणार? तर त्याविषयी स्वतः रणबीर कपूरने खुलासा केला आहे.
लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात रणबीरने या 'रामायण' या भव्यदिव्य सिनेमाच्या लांबीबद्दल (Run-time) भाष्य करताना सांगितले की, नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे दोन्ही भाग मिळून जवळपास सहा तासांचे फुटेज तयार आहे. रणबीरच्या मते, हा अनुभव जगप्रसिद्ध 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स' पेक्षा कमी नसेल. पहिल्या भागाचे काम पूर्ण होत आले असून दुसऱ्या भागाचे काही चित्रीकरण अद्याप बाकी आहे, त्यामुळे प्रत्येक भागाचा कालावधी तीन तासांहून अधिक असू शकतो.
या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रणबीर कपूरची दुहेरी भूमिकेत आहे. प्रभू श्रीरामाच्या मुख्य भूमिकेसोबतच रणबीर यात भगवान परशुरामांच्या रूपातही प्रेक्षकांसमोर येणार आहे. विष्णूचे हे दोन वेगवेगळे अवतार एकाच चित्रपटात साकारणे हे एक मोठे आव्हान असल्याचे त्याने मान्य केले.
'रामायण' सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया ठरणार आहे. रणबीरसोबत दाक्षिणात्य सुंदरी साई पल्लवी 'सीता' मातेच्या भूमिकेत दिसणार आहे, तर 'केजीएफ' स्टार यश याने 'रावण' साकारून त्याच्या चाहत्यांचं मन जिंकणार आहे. बजरंगबली हनुमानाची भूमिका सनी देओल साकारणार असून, लक्ष्मण म्हणून रवी दुबे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे.
याशिवाय मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे, अरुण गोविल, काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंग यांसारखी मोठी नावे या प्रोजेक्टशी जोडली गेली आहेत. नियोजनानुसार, रामायणाचा पहिला अध्याय २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल, तर युद्धाचा आणि विजयाचा दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या सोशल मीडियावर रणबीरने जो खुलासा केलाय त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

