Jackie Shroff : ऐंशी, नव्वदच्या दशकामधील सुपरहिट अभिनेत्यांच्या यादीमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांचं नाव टॉपला आहे. जवळपास चार दशकं सिनेसृष्टीमध्ये काम करत प्रेक्षकांना त्यांनी आपलसं केलं.
इतकच नव्हे तर रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारत त्यांनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जॅकी श्रॉफ यांच्या पावलांवर पाऊल टाकत लेक टायगर देखील सिनेविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. टायगरने हिरोपंती या सिनेमातूनबॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतरही तो बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसला. पण, त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल दाखवू शकले नाहीत.
दरम्यान, मुलाच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल जग्गू दादांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? 'मिड-डे'शी बोलताना जॅकी श्रॉफ यांनी म्हटलं, प्रत्येक कलाकाराला आपल्या करिअरमध्ये अशा गोष्टींना सामोरं जावंच लागतं. ते म्हणाले, "आयुष्य असंच असतं,या गोष्टी आपल्या हातात नसतात. तुम्हाला मेहनत करावी लागते. त्यामुळे कधी यश मिळेल, तर कधी नाही."
टायगरचं कौतुक करत जॅकी श्रॉफ म्हणाले...
अभिनेत्याने पुढे सांगितलं,टायगर कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक असतो. असं म्हणत त्यांनी लेकाचं कौतुक केलं. ते म्हणाले, "आम्ही कलाकार आहोत,त्यामुळे आमच्यापैकी प्रत्येकाला या परिस्थितीमधून जावंच लागतं. टायगरला हे माहीत आहे. तो म्हणतो,'मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करेन.' बाकी सर्व प्रेक्षकांवर अवलंबून आहे. ही उत्तम गोष्ट आहे."
दरम्यान, अभिनेते जॅकी श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी 'द ग्रेट ग्रॅंड सुपरहिरो- एलियन्स का आगमन' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट यावर्षी २९ मे रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रतीक स्मिता पाटील, भाग्यश्री दासानी, शरत सक्सेना, मिहिर गोडबोले या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

