Swati Deval Borivali Incident : स्वाती देवल ( swati deval) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून स्वाती देवल घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने नेहाच्या (प्रार्थना बेहरे) वहिनीची भूमिका साकारली होती. ग्रे शेड असलेली ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. अभिनेत्रीच्या लक्ष्मी निवास मालिकेमधील भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलंय. अशातच अभिनेत्रीसोबत मुंबईच्या बोरिवली परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
स्वाती देवलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपला अनुभव सांगितला आणि सर्वांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. स्वाती म्हणाली, "मला एक गोष्ट सांगायची आहे. लहानपणी आपण शाळेत ऐकलं होतं, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. खरोखरच आपला देश असा आहे की, या देशात अनेक धर्म, जात आणि पंथाचे लोक राहतात. अगदी गुण्यागोविंदाने, एकत्र आणि प्रेमाने राहतात. पण असं आपल्याला वाटत होतं. आता बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्या आहेत. टीव्हीवरील बातम्या, अनेक प्रसार माध्यमांमधून बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. वाईट कर्म करणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत, हे आपल्याला दिसत असतं. परंतु, या गोष्टी दुसरीकडे घडत असतात; त्यामुळे त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण माझ्याबरोबर एक घटना घडली".
स्वाती बोरिवली (पश्चिम) येथील गजबजलेल्या इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा परिसरात खरेदीसाठी गेली होती. यावेळी एका अनोळखी तरुणीने तिला गाठले आणि हिंदीत संवाद साधण्यास सुरुवात केली. स्वाती म्हणाली, "ती मला म्हणाली मॅम मला तुमच्याशी बोलायचं आहे. अर्थात तिने हे हिंदीत विचारलं. त्यावर मी तिला क्या? असं म्हटलं. तर ती म्हणाली, आपसे बायबल के बारें में बात करनी थी. क्या आप बायबल के बारें में जानना चाहोगे… मुझे आपसे बात करनी है. त्यावर मी तिला मुझे आपसे कुछ बात नही करनी. धन्यवाद असं म्हटलं आणि मी तिथून निघून आले".
स्वातीने पुढे सांगितले की, "मी तिथून पुढे गेले, तरी माझ्या डोक्यात विचार सुरू होता की ही बाई अचानक असं का विचारतेय? मी मागे वळून पाहिलं तर ती माझ्यावर लक्ष ठेवून होती आणि माझ्याच आसपास घिरट्या घालत होती. मी रागाने तिच्याकडे पाहिलं आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेले". स्वातीने दुरून त्या मुलीवर लक्ष ठेवले असता, तिला आणखी एक मुलगी तिथे दिसली. या दोन्ही मुली बाजारपेठेत येणाऱ्या महिलांना गाठून त्यांच्याशी कुजबुजत होत्या. स्वाती म्हणाली, "माझं चुकलं की मी त्यांचा व्हिडीओ शूट केला नाही, पण त्या दोघींच्या हालचाली अत्यंत संशयास्पद होत्या".
स्वातीचं कळकळीचं आवाहन
हा व्हिडीओ शेअर करताना स्वातीने कॅप्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. तिने लिहिले, "सावधान, काळजी घ्या, फसू नका. अशा लोकांशी बोलू नका. तुम्ही तुमच्या मतांशी, विचारांशी, हिंदुत्वाशी आणि तुमच्या धर्माशी एकनिष्ठ राहा. तुम्ही आपले आहात म्हणून ही गोष्ट सांगितली. जय भवानी, जय शिवाजी!".

