Dailyhunt
'छावा'नंतर विकी कौशलचा 'महावतार'; परशुरामांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा १८ महिन्यांचा 'मास्टर प्लॅन'

'छावा'नंतर विकी कौशलचा 'महावतार'; परशुरामांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा १८ महिन्यांचा 'मास्टर प्लॅन'

CNX Masti 2 weeks ago

'छावा' चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेनंतर विकी कौशल आता एका मोठ्या पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'महावतार' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.

भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानल्या जाणाऱ्या 'परशुराम' यांची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असून, या भूमिकेसाठी विकीने आपली सर्व ताकद पणाला लावल्याचे दिसत आहे.

'महावतार' ही केवळ एक फिल्म नसून विकी कौशलसाठी तो एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी विकीने स्वतःवर तब्बल १८ महिने काम करणार आहे. विशेष म्हणजे, या काळात तो कोणताही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही. पात्राची गंभीरता आणि भव्यता पाहता विकीने हा मोठा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विकी कौशल संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील गाण्यांचे शूटिंग सध्या सुरू असून, हे काम पूर्ण होताच विकी पूर्णपणे 'महावतार'च्या तयारीला लागेल.

विकीच्या या ट्रान्सफॉर्मेशनसाठी सुमारे ६ महिने लागतील. दिग्दर्शक अमर कौशिक यांनी विकीसाठी एक विशेष 'मॉड्यूल' तयार केले आहे. यामध्ये केवळ शारीरिक बदलच (Physical Transformation) नाही, तर परशुरामांच्या पात्रातील मानसिक आणि भावनिक पैलूंचा अभ्यास करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

'महावतार'चे भव्य शुटिंग हे जानेवारी २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटाची तयारी, व्हीएफएक्स (VFX) आणि विकीचा लूक यावर सध्या वेगाने काम सुरू आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२७ मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात धडकण्याची दाट शक्यता आहे. 'स्त्री २' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक अमर कौशिक आणि विकी कौशल यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti