ABCD 3 Movie:सिनेमा, गाणी आणि त्यापाठोपाठ येणारं नृत्य हा सिनेमांमधील महत्त्वाचा घटक आहे. पण काही सिनेमे हे त्यापलीकडे जाणारे असतात.असाच नृत्याच्या अफाट जगाची सफर घडवणारा सिनेमा म्हणजे एबीसीडी. पहिल्या भागाच्या यशानंतर या सिनेमाच्या सीक्वलला देखील तितकाच उत्तम प्रतिसाद मिळाला.
रेमो डिसुझा दिग्दर्शित या सिनेमाला तरुणाईने अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.
रेमो डिसूझा दिग्दर्शित 'एबीसीडी' सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं. दुसऱ्या भागानंतर, चाहते बऱ्याच काळापासून तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. मिडिया रिपोर्टनुसार, रेमो डिसूझाने 'ABCD 3' च्या पटकथेवर काम सुरू केलं आहे. ज्याचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याचं बोललं जातंय. जवळपास ११ वर्षानंतर रेमो डिसूझा 'ABCD 3' हा चित्रपट घेऊन येत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, अद्याप रेमोने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'ABCD' ने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केलं. चाहत्यांनी चित्रपटातील कलाकारांच्या नृत्यकौशल्याचं भरभरून कौतुक केलं होतं.
चित्रपटाचा दुसरा भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. यात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटामधील वरुण आणि श्रद्धाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली.त्यात आता 'एबीसीडी ३'बद्दल माहिती मिळते आहे. मात्र, चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल अजूनही कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

