'मास्टरशेफ ऑफ इंडिया' पहिल्या सीझनच्या विजेत्या पंकज भदौरिया यांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.
पंकज भदौरिया यांनी हॉस्पिटलमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. "मला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे", असं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये त्या म्हणतात, "मला नुकतंच ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. तुम्हीदेखील माझं कुटुंबच आहात. त्यामुळे मला हे तुमच्याबरोबर शेअर करावंसं वाटलं. सध्या मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. कारण प्रार्थनांमध्ये चमत्कार घडवण्याची शक्ती असते". काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी फूल बॉडी चेकअप करवून घेतलं होतं. ४५ वर्षांवरील चाहत्यांना त्यांनी वर्षातून एकदा बॉडी चेकअप करवून घेण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय लक्षण दिसण्याची वाट पाहू नका त्याआधीच काळजी घ्या, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.
पंकज भदौरिया सध्या कॅन्सरवर उपचार घेत आहेत. 'मास्टरशेफ ऑफ इंडिया' पहिल्या सीझनच्या त्या विजेत्या होत्या. मास्टरशेफमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी १६ वर्षांपासून करत असलेली शिक्षिकेची नोकरी सोडली होती. त्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना रेसिपीचे व्हिडीओ बनवून शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे २.६ मिलियन फॉलोवर्स आहेत. याआधी हिना खान, राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे.

