बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या उमटवणाऱ्या दोन लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण. या दोघीही यंदा 'मेट गाला २०२६' च्या रेड कार्पेटवर दिसणार नाहीत.
प्रियांका चोप्राने यापूर्वी आपल्या लूकने अनेकदा रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, त्यामुळे तिच्या लूकबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. मात्र, यंदा ती या सोहळ्याचा भाग नसल्याने चाहत्यांमध्ये काहीशी निराशेची भावना आहे.
प्रियांकासोबतच दीपिका पादुकोण देखील यंदा रेड कार्पेटवर दिसणार नाही. प्रियांका आणि दीपिका या दोघी मेट गाला २०२६ मध्ये गैरहजर राहण्याची नेमकी कारणं काय, जाणून घ्या
मेट गालाच्या रेड कार्पेटवर नेहमीच आपल्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रियांका चोप्रा यंदा या सोहळ्यात दिसणार नाही. सुरुवातीला ती तिच्या 'वाराणसी' या आगामी चित्रपटामुळे उपस्थित राहू शकणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका तिच्या 'सिटाडेल' या प्रसिद्ध वेबसीरिजच्या नवीन सीझनच्या प्रमोशनसाठी जागतिक दौऱ्याला जाणार आहे. हा दौरा झाल्यावर ती लॉस एंजेलिसला जाणार आहे, जिथे तिला सलग दुसऱ्या वर्षी गोल्ड हाउस गालामध्ये 'ग्लोबल वॅनगार्ड अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात येणार आहे. या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे प्रियांकाने यंदा मेट गालाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दीपिका पादुकोण का असणार अनुपस्थित?
दुसरीकडे, दीपिका पदुकोण देखील यंदा या फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होणार नाही. अनेक चाहते दीपिकाला तिच्या 'बेबी बंप'सह रेड कार्पेटवर पाहण्यासाठी उत्सुक होते, मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दीपिका सध्या तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्राधान्य देत आहे. आपल्या प्रेग्नेंसी दरम्यान ती ठरलेल्या वेळेत चित्रपटांचे काम पूर्ण करायच्या मागे आहे. सध्या ती 'किंग' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून अल्लू अर्जुनच्या 'राका' चित्रपटातही ती दिसणार आहे. यामुळे तिने मेट गालापासून दूर राहणे पसंत केले आहे.
मेट गाला २०२६ बद्दल
यंदाचा मेट गाला सोहळा ५ मे रोजी न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पार पडणार आहे. या वर्षाची थीम"फैशन ही एक कला है" अशी ठेवण्यात आली आहे. या सोहळ्यात निकोल किडमन, बियॉन्से, रिहाना, किम कर्दाशियन आणि केंडल जेनर यांसारख्या जागतिक स्तरावरील अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. भारताकडून ईशा अंबानी तिच्या प्री-मेट गाला लूकमुळे चर्चेत राहिली असून, चित्रपट निर्माते करण जोहर यंदा पहिल्यांदाच मेट गालाच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवणार आहेत.

