'रामायण' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय सनी देओल पवनपुत्र हनुमानाची भूमिका साकारणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.
हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण'चा पहिला टीझर रिलीज झाला होता. या टीझरमध्ये रणबीर कपूरला आपण सर्वांनी श्रीरामांच्या भूमिकेत पाहिलं. अशातच 'रामायण'चे दिग्दर्शक नितेश तिवारींनी सिनेमातील त्यांच्या आवडत्या प्रसंगाबद्दल खुलासा केला आहे.
हा आहे नितेश तिवारींचा आवडता सीन
'रामायण'च्या टीझर लाँचवेळी नितेश तिवारींनी सांगितलं की, ''राम जेव्हा वनवासाला जायला निघतात त्यावेळची ती भावना मी योग्य प्रकारे दाखवू शकलो की नाही, हे मला बघायचंय. राम वनवासास जावे, ही कोणाचीच इच्छा नाही. सर्वजण श्रीरामांसह रडत आहेत. हा प्रसंग माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. जेव्हा जेव्हा मी हा प्रसंग पाहतो तेव्हा मला रडायला येतं. मला आशा आहे की, प्रेक्षकांवरही या सीनचा परिणाम होईल.''
अशाप्रकारे नितेश तिवारींनी हा खुलासा केला. 'रामायण'च्या टीझरमध्ये दिसेल की, एक सीन असा आहे की, संपूर्ण अयोध्या नगरी त्यांना निरोप द्यायला आलेली असते. रथाची चाकं नदीकिनारी सरकतात. जेव्हा श्रीराम, सीता आणि लक्ष्मण बोटीमधून वनवासाला जायला निघतात. त्यावेळी श्रीरामांना ''राम राम'' अशी दशरथांची हाक ऐकू येते. त्यावेळी राम मागे वळून बघतात. टीझरमधील हा सीन बघून अनेकांचे डोळे पाणावले. त्यामुळे जेव्हा मोठ्या पडद्यावर हा सीन दिसेल तेव्हा प्रेक्षक भावुक होतील यात शंका नाही. 'रामायण' सिनेमाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti