गेल्या काही महिन्यांपासून ज्या चित्रपटाची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू होती, त्या नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाचा 'फर्स्ट लुक' अखेर आज हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. 'बर्फी', 'संजू' आणि 'ॲनिमल'सारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा रणबीर कपूर आता पहिल्यांदाच पौराणिक भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूरचा 'प्रभू श्रीराम' अवतार पाहून प्रेक्षक भारावले आहेत. मात्र, टीझरच्या शेवटच्या काही सेकंदांत साऊथ सुपरस्टार 'रॉकिंग स्टार' यश (Yash) याने ''दशानन' अर्थात रावणाच्या भूमिकेत जी एन्ट्री घेतली, ती पाहून चाहते थक्क झालेत.
'रामायण'च्या या टीझरच्या शेवटी शेवटी रावणाच्या भूमिकेतील यशचा मागील बाजूने घेतलेला एक 'पॉवरफुल' शॉट दाखवण्यात आला आहे. यात तो आपल्या भव्य 'पुष्पक विमाना'च्या दिशेने अत्यंत रुबाबदारपणे चालताना दिसत आहे. यशचा तो रांगडा देह आणि रावणाची ती आक्रमक चाल पाहून चाहते अक्षरशः क्रेझी झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियेचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, "असे वाटते की रावणाचे पात्र जिवंत करण्यासाठीच यशचा जन्म झाला आहे". यशच्या 'रावण' लूकची फक्त एक झलकच चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेशी ठरली आहे. आता पूर्ण चित्रपटात त्याचा अवतार कसा असेल, याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
कधी प्रदर्शित होणार रामायण सिनेमा?
या चित्रपटात केवळ रणबीर आणि यशच नाही, तर इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. साई पल्लवी माता सीता साकारत आहे. तर लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे दिसणार आहे. तर हा सिनेमा अतिशय मोठ्या बजेटमध्ये तयार केल्याचं म्हटलं जात आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी जाहीर केल्यानुसार, 'रामायण - भाग १' २०२६ च्या दिवाळीत जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत भेटीला येणार आहे. रणबीर कपूरच्या शांत आणि तेजस्वी श्रीराम अवताराला यशच्या ताकदवान रावणाची कशी टक्कर मिळणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

