सोशल मीडियावर 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर क्युट डान्स करून घराघरांत पोहोचलेला लाडका बालकलाकार साईराज केंद्रे (Sairaj Kendre) आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'सावळ्याची जणू सावली'मध्ये आता साईराजची एन्ट्री होणार आहे. प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
साईराजने केवळ रिल्सपुरते मर्यादित न राहता अभिनयातही आपली छाप पाडली आहे. झी मराठीच्या 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. इतकेच नाही, तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटात त्याने अभिनेता अमेय वाघ याच्या मुलाची (ऑनस्क्रीन) भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत आता एक नवीन ट्रॅक सुरू होणार आहे. या ट्रॅकमध्ये साईराज एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चिमुकल्याच्या येण्याने सावली आणि सारंगच्या आयुष्यात काय वळण येते, हे पाहणे रंजक ठरेल.
झी मराठीने अद्याप त्याच्या एन्ट्रीची अधिकृत तारीख जाहीर केली नसली, तरी प्रोमो पाहून चाहते "साईराजला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत" अशा कमेंट्स करत आहेत. साईराजच्या निरागस अभिनयाला मोठा चाहतावर्ग लाभला आहे. 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका आधीच टीआरपी शर्यतीत चांगली कामगिरी करत आहे, आता साईराजच्या एन्ट्रीमुळे या मालिकेच्या लोकप्रियतेत अधिक भर पडू शकते.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti