स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजानी खरीखुरी मेजवानी घेऊन आलं आहे. महाराष्ट्रच काय भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एखाद्या वाहिनीने एकाच वेळी एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नव्या कार्यक्रमांची घोषणा केली आहे.
पाठराखीण, सुना येती घरा, विसरु नका मला, आमच्या लाडक्या नाईक बाई, मराठी मिडीयम, मी कात टाकली, आता होऊ दे धिंगाणा ५ आणि स्टार प्रवाह गणेशोत्सव अश्या तब्बल ८ कार्यक्रमांची प्रवाह गर्जना नुकतीच करण्यात आली. या खास सोहळ्यात आठही कार्यक्रमांचे कलाकार आणि तंज्ञज्ञ उपस्थित होते.
स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही मालिका एका सामान्य शिक्षिकेची, तिच्या कुटुंबाची आणि तिच्या मुलींची गोष्ट सांगणारी ही मालिका असणार आहे. या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे.
'पाठराखीण' ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहाणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची. बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्राजक्ता गायकवाड, गौरी इंगवले, शुभंकर तावडे, आशय कुलकर्णी, अदिती देशपांडे, मिताली जगताप, शकुंतला नरे, रमेश वाणी, दीप्ती लेले असे अनेक दिग्गज कलाकार मालिकेत आहेत. विघ्नेश कांबळे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
'सुना येती घरा' ही मालिका दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्यांनी घडणाऱ्या बदलांची कथा उलगडणार आहे. अशोक शिंदे, मेघना वैद्य, दीपा परब, शर्मिष्ठा राऊत, सत्यजीत साळोखे, शुभम पडे, सिद्धव साळोखे, मनोज कोल्हटकर असे अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत.
'विसरु नको तू मला' एक उत्कट प्रेमकथा आहे. आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारा नायक आणि आपल्या स्वप्नांबरोबर या सच्च्या प्रेमाला सोबत घेऊन जाणारी नायिका यांची ही गोष्ट असणार आहे. तन्वी मुंडले, शाल्व किंजवडेकर,शृजा प्रभुदेसाई, शर्वाणी पिल्लई, राजेंद्र शिसाटकर, सिद्धार्थ खिरिड असे अनेक लोकप्रिय कलाकार मालिकेत आहेत.
चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी या लेखक दिग्दर्शक जोडीने आजपर्यंत अनेक दर्जेदार आणि सुपरहिट मालिका दिल्या आहेत. हीच लेखक दिग्दर्शकाची जोडी आता घेऊन येतेय मराठी अस्मिता टिकवणाऱ्या 'मराठी मीडियम'ची गोष्ट. अनेक दिग्गज कलाकार या मालिकेतून भेटीला येतील.
चमत्कारिक, गूढ, रहस्यमय आणि नाट्यमय कथांचा एक खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांच्याही मनोरंजनासाठी स्टार प्रवाह सज्ज आहे आणि म्हणूनच या मनोरंजनाच्या आख्यानात येणारी पुढची मालिका म्हणजे 'मी कात टाकली'. संतोष अयाचित या मालिकेती निर्मिती करणार आहेत.
या मालिकांसोबतच होऊ दे धिंगाणा सीझन ५ आणि स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळादेखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. स्टार प्रवाहवर नव्याने सुरू होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खरीखुरी मेजवानी ठरणार आहेत. या नव्या मालिकांसाठी चाहतेही उत्सुक आहेत.

