Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"स्वामींनीच आपल्याकडून हे करुन घेतलं...", स्नेहल तरडेची पोस्ट; 'देऊळ बंद २'ची होतेय चर्चा

"स्वामींनीच आपल्याकडून हे करुन घेतलं...", स्नेहल तरडेची पोस्ट; 'देऊळ बंद २'ची होतेय चर्चा

CNX Masti 1 week ago

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' चांगलाच गाजतोय. सिनेमाने मराठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलं आहे. सोशल मीडियावर सिनेमाचेच रील्स व्हायरल होत आहेत. प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहल तरडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली आहे. ११ वर्षांपूर्वी आलेल्या 'देऊळ बंद' सिनेमालाही अशाच प्रकारे यश मिळालं होतं. आता 'देऊळ बंद २'चं हे यश पाहून स्नेहल तरडेने नवऱ्यासाठी खास पोस्ट केली आहे.

'देऊळ बंद २'च्या सेटवरील काही फोटो पोस्ट करत स्नेहल तरडेने लिहिले, "तू, मी आणि 'देऊळ बंद २'...आज चित्रपट प्रदर्शित होऊन १ आठवडा झाला . चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आहे. तू आणि मी.. एकाच कलेच्या प्रेमात असणारी दोन माणसं! स्वामींनी आपल्याला एकत्र आणलं त्यात आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि आपलं आपल्या कलेवर असलेलं प्रेम, या दोन्ही गोष्टींची गुंफण घालून काहीतरी वेगळं साध्य करुन घ्यायचं होतं त्यांना हे आता कळतंय.. "

ती पुढे लिहिते, "आपलं निमित्त करुन अनेक सामाजिक प्रश्न, शेतकर्‍यांच्या समस्या, देवावर वाढत असलेली अश्रद्धा अशा अनेक गोष्टी अधोरेखित करुन त्यावरचे उपाय समाजाला सांगायचे होते स्वामींना. निर्मात्यांना चित्रपटातून मिळणारा नफा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलींच्या थांबलेल्या शिक्षणावर खर्च करण्याची बुद्धी देऊन, त्यांच्या स्त्रियांना आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मदत करायची होती स्वामींना.. योग्य वेळ साधून सगळं काही घडवून आणलं त्यांनी! त्यांच्या या एवढ्या मोठ्या कृपेचे आपण पात्र ठरलो आहोत हे आपले केवढे मोठे भाग्य म्हणायचे!! स्वामी महाराज, तुमची अशीच कृपा जन्मोजन्मी आमच्या भाग्यात येवो हीच तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय."

'देऊळ बंद २' या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत झळकले असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या प्रभावी संवादफेकीतून आणि भावनिक अभिनयातून श्रद्धेची ताकद प्रभावीपणे प्रकट होताना दिसते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: CNX Masti