Thursday, 16 Aug, 8.32 am CNX Masti

होम
वैभव तत्ववादीने त्याच्या आगामी सिनेमाचा पोस्टर केला शेअर

ठळक मुद्दे वैभवचा नवा चित्रपट 'ग्रे' वैभवसोबत पल्लवी पाटील व मयुरी देशमुख दिसण्याची शक्यता

हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारा अभिनेता वैभव तत्ववादी याने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. त्याच्या आगामी सिनेमाचे नाव 'ग्रे' असे आहे. या चित्रपटाचा पोस्टरही त्याने शेअर केला असून यात तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

अभिनेता वैभव तत्ववादीने 'फक्त लढा म्हणा' या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'सुराज्य', 'कॉफी आणि बरंच काही', 'शॉर्टकट', 'मि. अॅण्ड मिसेस सदाचारी' यांसारख्या मराठी सिनेमात आणि 'हंटर', 'बाजीराव मस्तानी' व 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या हिंदी चित्रपटात तो झळकला आहे. त्याने अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा 'व्हॉट्सअप लग्न' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमातील त्याची व अभिनेत्री प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. त्यानंतर आता त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना आगामी सिनेमाबद्दल सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर 'ग्रे' या सिनेमाचा पोस्टर शेअर करून लिहिले की,' स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आमच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सादर करतो. 'ग्रे' असे या सिनेमाचे नाव असून अभिषेक जावकरचा हा सिनेमा आहे. हा चित्रपट 2019मध्ये रिलीज होणार आहे.'

वैभवने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये दिलेल्या हॅशटॅगमध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील व मयुरी देशमुख यांनाही टॅग केले आहे आणि त्यांनी देखील ही पोस्ट आपल्या अकाउंटवर शेअर केल्या आहेत. त्यामुळे कदाचित या सिनेमात त्या दोघी वैभवसोबत मुख्य भूमिकेत दिसणार असतील. या चित्रपटाच्या पोस्टरवरील वैभवचा लूक पाहून त्याची ही वेगळी भूमिका असेल असे बोलले जात आहे. या पोस्टरनंतर या चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

Dailyhunt
Top