Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगाव पोलिसांच्या कारवाईत ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

जळगाव पोलिसांच्या कारवाईत ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

ळगाव - जळगाव जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळवत एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाची व्यावसायिक प्रमाणातील तस्करी उधळून लावली आहे. या कारवाईत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून, मोबाईल फोन व मोटारसायकलसह एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या "नशामुक्त भारत" अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबविली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यापार महामंडळ, सेक्टर ए-१४ परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान (वय ३६, रा. फातिमा नगर, जळगाव) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान या अमली पदार्थांचा पुरवठादार रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जि. नाशिक याचा सहभाग निष्पन्न झाला. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा, १९८५ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक, बबन आव्हाड यांच्या नेतृत्वातील सपोनि प्रमोद वाघ, पोउनि दिपक जगदाळे, पोउनि जितेंद्र वल्टे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ मुरलीधर धनगर, अकरम शेख, पोहेकॉ योगेश घुगे, पोहेकॉ प्रविण भालेराव, किशोर पाटील, विजय पाटील, पोकॉ छगन तायडे, रविंद्र कापडणे, प्रदीप सपकाळ, राहुल रगडे तसेच फॉरेन्सिक युनिटचे पोहेकॉ अमित माळी, पोहेकॉ संघपाल तायडे यांच्या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Crime Duniya