प्रभात

1M Followers

बाधितांवरही आता घरीच उपचार

20 Jun 2020.09:17 AM

लक्षणे दिसत नसलेल्यांना तपासणी करून हमीपत्रावर परवानगी


60 वर्षांवरील आणि अन्य रोग असलेल्यांनाच ऍडमिट करून घेणार

पुणे - करोना पॉझिटिव्ह असताना लक्षणे नसलेल्यांना किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत, अशा रुग्णांना ऍडमिट करून न घेता त्यांची तपासणी करून संपूर्ण माहिती घेऊन त्यांना घरीच राहण्याविषयी सांगावे, अशा सूचना सर्व महापालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालयांनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. आजपासूनच (दि. 20 जून) याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत.

कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. तसेच रोजच्या स्वॅब तपासणीही वाढल्या आहेत, त्या अडीच हजारांपर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढलेला दिसून येतो. बऱ्याच बाधितांना कोणतीच लक्षणे नाहीत तर काहींना सौम्य लक्षणे आहेत. त्यांनाही ऍडमिट करून घेतले जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन केले जात आहे. यापुढे कोणतीच लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्यांना ऍडमिट करून घेतले जाणार नाही, त्यांना घरीच क्वारंटाइन केले जाणार आहे.
ज्या ठिकाणी बाधित सापडले आहेत त्या इमारती सील करण्यात येत होत्या. आता तेही न करता ज्या बाधितांना घरात क्वारंटाइन केले आहे, त्यांचा मजलाच फक्त सील केला जाणार आहे.

घरी क्वारंटाइन करताना मात्र त्या रुग्णाची पूर्ण तपासणी केली जाणार आहे. खासगी लॅबच्या टेस्टमध्ये एखादा पॉझिटिव्ह सापडला असेल तरी त्याला महापालिकेकडे तो रिपोर्ट सादर करायचा आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात त्याची ऑक्‍सिजन लेव्हल, बीपी आणि अन्य महत्त्वाच्या बाबींची संपूर्ण तपासणी होईल. त्याला घरी ठेवले तर चालणार आहे की ऍडमिट करावे लागेल, याचा निर्णय तपासणीअंती घेण्यात येणार आहे. घरी ठेवायचे असेल तर रुग्णाकडून हमीपत्र घेण्यात येईल. रोज प्रकृतीची पालिकेच्या कॉल सेंटरमार्फत माहिती घेण्यात येईल.

बाधित 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल किंवा एखाद्या करोना बाधिताला उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, ऑक्‍सिजनची कमतरता, कॅन्सर किंवा अन्य दुर्धर आजार असेल तर त्यालाच ऍडमिट करून घेतले जाणार आहे, तशा सूचनाही महापालिकेची केंद्रे आणि खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.
- डॉ. संजीव वावरे, महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख

Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Dainik Prabhat

#Hashtags