Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आज राज्यात पुन्हा धुव्वाधार पाऊस बरसणार  ! ''या'' 22 जिल्ह्यांना अलर्ट

आज राज्यात पुन्हा धुव्वाधार पाऊस बरसणार ! ''या'' 22 जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून आज पुन्हा एकदा राज्यभरात पावसाचा हाहाकार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून आज दिनांक 31 जुलै रोजी राज्यातील विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यातील 8 ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर 14 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि रायगड येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात अधूनमधून जोरदार सरींसह वाऱ्याचा वेग वाढू शकतो. त्यामुळे समुद्रकिनारी जाणे तसेच मासेमारी करणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी जोरदार पावसासह मेघगर्जना होण्याचा अंदाज असून नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यावरही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट विभागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि बीड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून शेतीतील उभी पिके आणि काढणी केलेल्या उत्पादनांची योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इतर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि नागरिकांनी बाहेरील हालचाली करताना आवश्यक खबरदारी घ्यावी.

दरम्यान भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी कोणताही हवामान इशारा देण्यात आलेला नाही. या भागात पावसाची शक्यता तुलनेने कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडू शकतो. त्यामुळे स्थानिक हवामानातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar