Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोठी दुर्घटना ! समुद्रात बोट उलटून भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू

मोठी दुर्घटना ! समुद्रात बोट उलटून भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू

राज्याच्या राजकारणातून आता एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. समुद्रात बोट उलटून भाजप नेत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच खळबळ निर्माण झाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना 'सागरिका' नावाची नौका अचानक समुद्रात बुडाली. या भीषण दुर्घटनेत भाजपाचे मालवण तालुका उपाध्यक्ष तथा नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि त्यांचे खलाशी अक्षय हनुमंत राणे या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मालवण तालुका आणि भाजपच्या राजकीय वर्तुळात प्रचंड शोककळा पसरली आहे.

पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली दुर्घटना मिळालेल्या माहितीनुसार, मालवण येथील दांडी भागातील रहिवासी आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष सन्मेश सुरेश परब हे नेहमीप्रमाणे आपला मुलगा सुयोग परब आणि खलाशी अक्षय राणे यांच्यासोबत 'सागरिका' नौकेतून मासेमारीसाठी गेले होते. मात्र, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या नजीक पोहोचताच अचानक नौका खडकावर आदळल्याचा अंदाज आहे.

या अपघाताचा प्रसंगावलोकन अत्यंत क्लेशदायक होता. नौका बुडू लागताच तिघांनीही जिवाच्या आकांताने पाण्यात हातपाय मारण्यास सुरुवात केली. सन्मेश परब यांचा मुलगा सुयोग याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत वडिलांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे सुयोगच्या डोळ्यांदेखतच त्याचे वडील सन्मेश परब आणि खलाशी अक्षय राणे पाण्यात बुडाले. सुयोगने डोळ्यांसमोर आपल्या बापाला समुद्रात बुडताना पाहिले, परंतु लाटांच्या तीव्रतेमुळे तो असहाय्य ठरला.

'जयदेव लोणे' यांच्या नौकेमुळे सुयोगचा वाचला जीव दरम्यान, अपघात घडल्याचे लक्षात येताच जवळच मासेमारी करत असलेले जयदेव लोणे यांनी अजिबात वेळ न गमावता आपल्या नौकेसह मदतीसाठी धाव घेतली. जयदेव लोणे यांच्या नौकेने प्रसंगावधान राखून सुयोग परब याला तातडीने पाण्यातून बाहेर काढले, ज्यामुळे सुयोगचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने सन्मेश परब आणि अक्षय राणे या दोघांना वाचवण्यात यश आले नाही.

स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने सन्मेश परब आणि अक्षय राणे या दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भाजपच्या एका सक्रिय आणि अभ्यासू तालुकास्तरीय नेत्याचा, तसंच त्यांच्या सहकाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने दांडी परिसर आणि संपूर्ण मालवण शहरावर दुःखाचे सावट पसरले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar